दुपारनंतर पर्यटकांना रोखले
By admin | Published: July 10, 2017 01:35 AM2017-07-10T01:35:15+5:302017-07-10T01:35:15+5:30
लोणावळा शहर पोलिसांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवार व रविवार दोन्ही दिवस दुपारी तीन वाजता कुमार चौकात चारचाकी वाहनांसाठी बंद केला होता
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, सहारा अॅम्बी व्हॅली परिसरात जाणारा मार्ग लोणावळा शहर पोलिसांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवार व रविवार दोन्ही दिवस दुपारी तीन वाजता कुमार चौकात चारचाकी वाहनांसाठी बंद केला होता.
अवजड वाहनांना खंडाळा व वळवण एंट्री पॉइंट येथेच मज्जाव करण्यात आला असला, तरी दुचाकी व पादचारी यांना मात्र कोणतेही निर्बंध घालण्यात आले नव्हते. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर आज लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून कोंडी झाली होती. पुणेकर दुचाकीस्वारांची गर्दी आज वाखाणण्याजोगी होती. वाहतूक नियंत्रणासाठी सात पोलीस अधिकारी व शंभर पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त लोणावळा ते भुशी धरण परिसरात नेमण्यात आला होता.
शनिवार व रविवार, तसेच सुटीच्या दिवसांत पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा परिसरातील भुशी धरण, लायन्स व टायगर पॉइंट, गिधाड तलाव, सहारा पूल धबधबा, अॅम्बी व्हॅली परिसरात लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असल्याने मार्गांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. स्थानिकांसह पर्यटकांना तासन् तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.