तब्बल २८ वर्षांनंतर दहावीचे गणित सुटले
By admin | Published: June 10, 2015 03:09 AM2015-06-10T03:09:18+5:302015-06-10T03:09:18+5:30
पन्नाशीचे चोगले तब्बल २८ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर दहावी उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
मुंबई : अविनाश भालचंद्र चोगले हे मुख्यमंत्री कार्यालयातील शिपाई मंगळवारी मंत्रालयात पेढे वाटत फिरत होते. पन्नाशीचे चोगले तब्बल २८ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर दहावी उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रत्येकाच्या हातावर पेढा ठेवताना आता यापुढे आपण ‘शिपाईगिरी’ करणार नाही कारकून होणार, हे ते आवर्जून सांगत होते.
चोगले हे १९८७ मध्ये सर्वात प्रथम दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्या वेळी इंग्रजी, गणित, इतिहास-भूगोल आणि हिंदी या चार विषयांत त्यांना अपयश आले. १९९० मध्ये त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागात शिपायाची नोकरी लागली. आपण दहावी झालो नाही याची खंत चोगले यांना सतत जाणवायची. त्यांनी खासगी क्लास लावून मार्च व आॅक्टोबर असा परीक्षा देण्याचा सपाटा लावला. हिंदी, इतिहास-भूगोल इतकेच काय इंग्रजी हे विषय टप्प्याटप्प्याने सुटले. मात्र गणिताच्या कोड्याने चोगलेंची दहावीची वाट रोखली होती.
भांडुपच्या नवजीवन विद्यामंदिरातील शिक्षक आणि आई-वडील व पत्नी यांनी चोगले यांची पाठराखण केली. घरचा मासे विक्रीचा व्यवसाय आई पाहायची. आता पंच्याहत्तरी झालेल्या आईला हा व्यवसाय करणे झेपत नाही. त्यामुळे चोगले यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडली. परंतु पत्नीने ही जबाबदारी घेत आपल्या नवऱ्याला सकाळचा वेळ अभ्यास करायची उसंत दिली. कार्यालयातील फावल्या वेळात चोगले गणित सोडवायचे़ गेल्या २८ वर्षांतील प्रश्नपत्रिका त्यांनी अनेकदा सोडवल्या. पन्नाशीला आलेल्या चोगलेंनी या वेळी गणित सोडवण्याचा निर्धार केला होता. निकालाच्या अगोदर त्यांना दहावी उत्तीर्ण झाल्याचे कळले होते. तरीही धडधडत्या छातीने सोमवारी आपला निकाल पाहिला. ३८ गुण मिळवून चोगलेंचे गणित सुटले. (विशेष प्रतिनिधी)