अखेर गुणांच्या खैरातीला चाप

By admin | Published: July 15, 2017 01:07 AM2017-07-15T01:07:14+5:302017-07-15T01:07:14+5:30

तोंडी परीक्षा याद्वारे गुणांची खैरात करण्यात येत असल्याने निर्माण झालेला गुणांचा फुगवटा दूर करण्यासाठी राज्य मंडळाला जाग आली

After all, the arithmetic of quality marks | अखेर गुणांच्या खैरातीला चाप

अखेर गुणांच्या खैरातीला चाप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांवर कला व क्रीडागुण, तोंडी परीक्षा याद्वारे गुणांची खैरात करण्यात येत असल्याने निर्माण झालेला गुणांचा फुगवटा दूर करण्यासाठी राज्य मंडळाला जाग आली आहे. इयत्ता ९ वी व १० वीच्या भाषा विषयांसाठी तोंडी परीक्षा घेऊन शाळांकडून सरसकट दिल्या जाणाऱ्या २० गुणांवर रोक लावण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. ९ वीसाठी या निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून होणार आहे, तर १० वीसाठी पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
राज्य मंडळाकडून सर्व शाळांना परिपत्रक पाठवून ९ वीच्या गुणपद्धतीमध्ये झालेल्या बदलांची माहिती कळविली आहे. भाषा विषयांसाठीची २० गुणांची तोंडी आणि ८० गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करून नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा विषयाची १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. गणित (बीजगणित व भूमिती) या विषयासाठी मात्र ८० गुणांची लेखी परीक्षा व २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी कायम ठेवण्यात आले आहेत. विज्ञान विषयाचे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असलेले २० गुणही कायम ठेवण्यात आले आहेत.
यंदाच्या वर्षापासून इयत्ता ९ वी अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. त्यामुळे ९ वीच्या सर्व विषयांची मूल्यमापन पद्धती त्यांनी जाहीर
केली आहे.
भाषा विषयाच्या तोंडी परीक्षांमध्ये शिक्षकांकडून सर्व विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी मार्क दिले जात आहेत. त्यामुळे दहावीला विद्यार्थ्यांचे गुण चांगलेच फुगू
लागले होते.
गुणांच्या फुगवट्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य
यंदाच्या दहावीच्या निकालामध्ये राज्यातील १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. नव्वद टक्क्यांचा टप्पा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तर हजारांत होती. त्यामुळे अगदी ९५ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही अकरावीसाठी त्यांना हवे असलेले महाविद्यालय मिळू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे या गुणांच्या फुगवट्याला अटकाव करण्याची मागणी होत आहे.
राज्य मंडळाकडून लपवाछपवी
नववीच्या भाषा विषयाची तोंडी परीक्षा न घेण्याचा निर्णयाचे परिपत्रक राज्य मंडळाकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाठविण्यात आले नाही.
संकेतस्थळावर टाकण्यात आलेले परिपत्रकही काही वेळातच पुन्हा काढून टाकण्यात आले. शाळांच्या मुख्याध्यापकांना याबाबतचे परिपत्रक मिळाल्यानंतर ही माहिती उजेडात आली आहे.
>अभ्यासक्रम
बदलल्याने बदल
नववीचा अभ्यासक्रम बदलल्याने त्यांच्या विषयांच्या मूल्यमापनामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आणखी तपशीलवार परिपत्रक तयार करण्याचे काम सुरू असल्याने त्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नव्हती.
- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ

Web Title: After all, the arithmetic of quality marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.