अखेर लाचखोर अधीक्षक निलंबित
By Admin | Published: November 2, 2016 05:42 AM2016-11-02T05:42:50+5:302016-11-02T05:42:50+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी विजय पिराजी चिंचाळकर याला अखेर खात्यातून निलंबित करण्यात आले
मुंबई : न्यायालयाने दोषी ठरविलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी विजय पिराजी चिंचाळकर याला अखेर खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात लाचखोरीच्या एका प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून पाच वर्षांची कारावसाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला. त्यानंतर त्याला शिक्षाधीन बंदी म्हणून ४८ तासांहून अधिक काळ कारागृहात राहावे लागल्याने त्याच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
रत्नागिरीत पाच लाखांची लाच घेताना सापडलेल्या चिंचाळकरला कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी पोस्टिंग देण्यात आली होती. अखेर रत्नागिरी सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरविल्याने त्याचे निलंबन करणे भाग पडल्याचे सांगितले. लाचखोरीच्या प्रकरणात शिक्षा झालेला विभागातील पहिला वरिष्ठ अधिकारी आहे.
पाच आॅक्टोबरला सत्र न्यायालयाने लाच प्रकरणात त्याला दोषी ठरवत ५ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड ठोठाविला. त्यानंतर त्याची रत्नागिरी कारागृहात रवानगी करण्यात आली. पाच दिवसांनंतर त्याची जामीनावर मुक्तता झाली. मात्र ४८ तासाहून अधिककाळ शिक्षा व तितक्याच काळाहून अधिक कारागृहात राहावे लागल्याने त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये नियम ४ च्या पोटनियम (४) (२)तरतुदीनुसार
त्याची दोषी ठरलेल्या दिनांकापासून निलंबन करण्यात आले. त्याबाबतचा आदेश गृहविभागाने नुकताच बजाविला आहे. (प्रतिनिधी)
>रत्नागिरीत रंगेहाथ पकडले
विजय चिंचाळकर याने रत्नागिरी येथे अधीक्षक असताना लाच स्वीकारताना त्याला एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर दोन वर्षांचा निलंबन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चंद्रपूरला अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.