अखेर उपचाराअभावी त्या वाघाचा मृत्यू, वनविभागाच्या उदासीनतेनं घेतला वाघाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 04:37 PM2018-02-25T16:37:06+5:302018-02-25T16:37:06+5:30
चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुुली बिटात आढळलेल्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी उपचाराविना दुर्दैवी मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी वाघ बसून असल्याचे दिसून आले होते. त्याच्या उजव्या पायाला व डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे त्याला उपचाराची नितांत गरज होती.
चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुुली बिटात आढळलेल्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी उपचाराविना दुर्दैवी मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी वाघ बसून असल्याचे दिसून आले होते. त्याच्या उजव्या पायाला व डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे त्याला उपचाराची नितांत गरज होती.
चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे वाघाला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी मागितली होती. शनिवारी रात्री परवानगी मिळाली. तोपर्यंत उशीर झालेला होता. आज दुपारी सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्यासाठी नऊ जणांची चमू घटनास्थळी आली. मात्र तत्पूर्वी वाघाने जगाचा निरोप घेतला होता. उपचारासाठी वाघाला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी वेळीच मिळाली असती तर वाघाला वाचविता आले असते, असे बोलले जात आहे. वाघाचा मृतदेह नजीकच्या खडसंगी येथे हलविले आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून 20 किमी अंतरावरील भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक पाचमध्ये गाव तलावाजवळ जखमी अवस्थेतील वाघ वनकर्मचारी व नागरिकांना दिसला होता. जखमी असल्यामुळे तो दुसरीकडे जाऊ शकत नव्हता. यानंतर वन अधिकाऱ्यानी गुरुवारी दुपारी जखमी वाघाच्या जवळ कॅमेरे लावून त्याच्या हालचाली टिपण्यात आल्या. त्यामध्ये वाघाच्या शरीरावर असलेल्या जखमा व पशू चिकित्सकाचा अहवाल मुख्य वन संरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला. वाघाला असलेल्या जखमा व पशु चिकित्सक यांच्या अहवालाचे निरीक्षण करून जखमी वाघाला ट्रॅक्युलायझेशन करण्याची परवानगी पीसीसीएफ नागपूर यांनी दिली तरच या जखमी वाघावर उपचार करता येणार होते. शुक्रवारी दुपारी घटनास्थळावर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, सहाय्यक उपवन संरक्षक आर. एम. वाकडे यांनी जखमी वाघाची पाहणी केली. मात्र रात्रीपर्यंत वाघाला ट्रॅक्युलायझेशन करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे चवथ्या दिवशीही या जखमी वाघावर उपचार करण्यात आले नाही. जखमी वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी पहारा देत होते. गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान वाघ तलावात पाणी प्यायला. शुक्रवारपासून वाघ त्या ठिकाणाहून उठलाच नाही. त्याला घमेल्यात पाणी पाजावे लागले. वाघाची प्रकृती खालावत होती. मात्र पशु वैद्यकीय अधिकारी उपचार करू शकत नव्हते. कारण सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी नव्हती. परवानगी मिळाली तेव्हा वेळ हातून निघून गेली होती. खडसंगी येथे वाघाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.