अखेर महापौरांची गच्छंती!
By admin | Published: June 19, 2015 12:39 AM2015-06-19T00:39:10+5:302015-06-19T00:40:53+5:30
लाच प्रकरण : तृप्ती माळवींचे ‘नगरसेवक’पद रद्द; राज्य शासनाची कारवाई, सेवाही खंडित
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील खासगी जमीनमालकास पर्यायी जागा देण्यासाठी १६ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या तृप्ती माळवी यांची महापौरपदावरून अखेर गच्छंती झाली. त्यांंचे नगरसेवक पदच राज्य शासनाने रद्द केल्याने महापौरपदही आपोआपच रद्द झाले. गुरुवारी सायंकाळी त्यासंबंधीचा आदेश येताच त्यांचे वाहन, मोबाईल व नोकरही तातडीने काढून घेण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली.
‘कोल्हापूरच्या प्रथम नागरीक’ असलेल्या महापौर माळवी यांना महापौरांच्या दालनातच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० जानेवारीस पकडले. त्यांच्या खासगी स्वीय सहायकासही याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणी महापौर तृप्ती अवधूत माळवी व खासगी स्वीय सहायक अश्विन मधुकर गडकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संतोष हिंदुराव पाटील यांनी त्यासंबंधीची तक्रार दिली. ही कारवाई झाल्यानंतर महापौर स्वत:हून राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती, परंतु राजकीय कुरघोडीतून ठरावीक नेत्यांनी त्यांना पाठबळ दिल्याने लाचेची कारवाई हे षड्यंत्र असल्याचा कांगावा करीत त्यांनी राजीनामा देण्याचे टाळले. त्या राष्ट्रवादीच्या महापौर; परंतु त्या पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचाही आदेश त्यांनी धुडकावून लावला. त्यामुळे महापालिकेतील सत्तारूढ आघाडीने त्यांच्यावर बहिष्कार टाकून कामात असहकाराची भूमिका घेतली होती. त्यानंतर २० एप्रिलला शासनाकडे महापालिका अधिनियम कलम १३ (१)(अ) व (ब) नुसार नगरसेवक व त्या अनुषंगाने महापौरपदावरून काढून टाकण्याची कारवाई करावी, अशी विनंती केली होती. २३ एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी अभियोग राज्य शासनाकडे सादर केला. ८ मे या दोन ठरावांच्या अनुषंगाने महापौरांना दहा दिवसांची नोटीस लागू केली व १६ मे रोजी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे म्हणणे मांडले. १० जूनला त्यांची सुनावणी झाली. त्याचा निकाल बुधवारी (दि. १७) राज्यमंत्र्यांनी दिला. नगरविकास विभागाचे सहसचिव पी. टी. गौड यांनी तो जिल्हाधिकाऱ्यांना कळविला. जिल्हाधिकाऱ्यांनी हाच आदेश तातडीने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना देऊन महापौरांच्या सेवा खंडित करण्याचे आदेश दिले.
अस्मिता जपली
माळवी यांचे महापौरपद रद्द झाल्याचे वृत्त महापालिकेत सायंकाळी सातच्या सुमारास धडकताच खळबळ उडाली. महापालिकेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा होत आहे. तिच्या नियोजनासाठी सत्तारूढ आघाडीची बैठक सुरू होती. त्यावेळी ही बातमी समजताच सर्व नगरसेवक चौकात जमा झाले व त्यांनी आनंद व्यक्त केला. शासनाच्या अभिनंदनाचा ठरावही आजच्या सभेत मंजूर करण्यात येणार आहे. कोल्हापूरची अस्मिता शासनाने जपली व ‘देर आये परंतु दुरुस्त आये,’ अशा प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटल्या.
उच्च न्यायालयात दाद मागणार
राज्य शासनाने निव्वळ राजकीय आकसापोटीच ही कारवाई केली आहे. मला कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे याबाबत तत्काळ उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
- तृप्ती माळवी (माजी महापौर)
आता पुढे काय?
तृप्ती माळवी यांच्या विरोधात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा आहे आणि त्यानुसार माळवी समर्थकांनी हालचालीही सुरू केल्या आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात आज, शुक्रवारीच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. शासनाच्या निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिल्यास माळवी यांना पुढील न्यायालयीन सोपस्कार पूर्ण होईपर्यंत पुन्हा पदावर राहण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
मीना सूर्यवंशी यांना संधी शक्य
उर्वरित कालावधीत महापौरपदासाठी माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासमर्थक नगरसेविका मीना सूर्यवंशी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्यवंशी यांच्याबरोबरच दीपाली ढोणुक्षे व वैशाली डकरे यांनीही महापौरपदासाठी फिल्डिंग लावली आहे.
दीड महिन्याचेच
ठरणार नवे महापौर
माळवी यांनी न्यायालयीन लढा न दिल्यास नव्या महापौर निवडीचे सोपस्कार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहेत. दरम्यान, महापालिका निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. निवडणुकीची आचारसंहिता १५ ते २० आॅगस्टदरम्यान लागणार आहे. त्यामुळे नवीन महापौरांना फक्त दीड ते दोन महिन्यांचाच कार्यभार मिळणार आहे.