अखेर एफडीए आयुक्तांची बदली
By admin | Published: June 6, 2017 06:06 AM2017-06-06T06:06:38+5:302017-06-06T06:06:38+5:30
एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांची उद्योग विभागात विकास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली
अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांची उद्योग विभागात विकास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे, तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवपदी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘लोकमत’मध्ये एफडीए मधील नियमबाह्य कामकाजाविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. विरोधी पक्षनेत्यांनी या वृत्तमालिकेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
एफडीएमधील दक्षता विभाग संपुष्टात आणणे, सचिव आणि मंत्र्यांना कोणतीही माहिती न देता केंद्राच्या कायद्यात बदल करणे या सगळ्या प्रकाराची ‘लोकमत’ने माहिती प्रकाशित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले होते. अद्याप एफडीएला कोणाची नियुक्ती केलेली नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याविषयीदेखील वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदली राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून आबासाहेब जऱ्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग विभागाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांना देखील मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
आदिवासी विभागाच्या सहसचिवपदी एस. वाय. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी आर.व्ही. निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव महापालिकेचे आयुक्त आर.एस. जगताप यांना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या ‘होम टाउन’ नागपुरात नेले असून ते आता नागपूर विभागीय आयुक्तालयात अतिरिक्त विभागीय आयुक्त असतील. सहकार विभागात काही महिन्यापूर्वी पाठवण्यात आलेल्या जगदीश पाटील यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सहकार खाते मिळाल्याबद्दल ते नाराज होते. त्यांना आता कोकण विभागीय आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे.
अन्य बदल्यांमध्ये दुग्ध विकास व पशुसंवर्धन सचिवपदी व्ही.व्ही. देशमुख, चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी जयश्री भोज, लॉटरी आयुक्तपदी निपुण विनायक यांचे आदेश काढण्यात आले आहेत. सांगली जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची संचालक भूजल सर्व्हेक्षणपदी पाठवण्यात आले असून फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एन. काळम यांना सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे. बी.एस. कोळसे यांना नियोजन विभागात सहसचिवपदी, गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांना अकोला जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर ए.डब्ल्यू. काकडे यांना पुणे म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमण्याचे आदेश काढण्यात आले आहे.
>मंत्र्यांना अंधारात ठेवून बदल्या केल्या!
एफडीए मधील सहायक आयुक्त अन्न, सहायक आयुक्त औषध, अन्न सुरक्षा अधिकारी व औषध निरीक्षक यांच्या बदल्या एफडीए आयुक्तांनी ३१ मे रोजी केल्या. मात्र, त्याची कोणतीही माहिती मंत्री गिरीश बापट यांना व त्यांच्या कार्यालयाला दिली गेली नाही. ही माहिती मंत्री कार्यालयास देणे आवश्यक होते, पण ५ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत आम्हाला ही माहिती मिळालेली नाही, ती तातडीने सादर करा, असे लेखी आदेश मंत्री कार्यालयाने आयुक्तांना पाठवले. आता आयुक्तांची बदली झालेली नाही, त्यामुळे त्यांनी परस्पर केलेल्या बदल्यांचा फेरआढावा घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.