अखेर तीन कुटुंबे बहिष्कारमुक्त
By Admin | Published: October 30, 2015 01:23 AM2015-10-30T01:23:55+5:302015-10-30T01:23:55+5:30
जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून गावाने बहिष्कृत केलेल्या तीन कुटुंबांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी त्या तीन कुटुंबांना बहिष्कारातून मुक्त केले.
संतोष कुंडकर, चंद्रपूर
जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून गावाने बहिष्कृत केलेल्या तीन कुटुंबांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी त्या तीन कुटुंबांना बहिष्कारातून मुक्त केले.
‘लोकमत’ने २८ आॅक्टोबर रोजी या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी या वृत्ताची दखल घेत, बुधवारी सायंकाळी मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांना तातडीने आंबोली येथे रवाना केले. तेथे महामुने यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली.
सर्वप्रथम गोकुलदास मेश्राम, इंद्रजीत गावतुरे, आनंदराव नन्नावरे या बहिष्कृत कुटुंंब प्रमुखांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांनही बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी बाबाराव महामुने यांनी गावकऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याबाबत माहिती दिली. हे कृत्य कसे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्याचे काय दुष्पपरिणाम होतील, हे पटवून दिले. त्यानंतर हरिभाऊ पाथोडे यांनी दीड तास गावकऱ्यांचे प्रबोधन केले. अखेर गावकऱ्यांनी आपली चूक कबूल करीत, आजपासून आम्ही त्या तीन कुटुंबांवरील बहिष्कार मागे घेत आहोत, असे जाहीर करून यापुढे गावातील एकोपा कायम राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे सांगितले. पोलिसांना तसे लेखी दिले. त्यामुळे बहिष्कार प्रकरणावर पडदा पडला.