अखेर राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By admin | Published: April 21, 2017 11:54 PM2017-04-21T23:54:55+5:302017-04-21T23:54:55+5:30
गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस दलातील निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना (जीटी) अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील ४९२ निरीक्षकांच्या बदल्या
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस दलातील निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना (जीटी) अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील ४९२ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले.
मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ५०हून अधिक अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नवीन जागी हजर होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत.
दरवर्षी ‘जीटी’ या साधारण मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होतात. या वेळी मात्र एक महिन्यापूर्वी बदल्यांचे आदेश जारी करून अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्षे सुरू होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी जाता येणार आहे.
मुंबई आयुक्तालयात आठ वर्षे व अन्य आयुक्तालय व परिक्षेत्रात सहा वर्षे आणि एका जिल्ह्यात दोन वर्षांहून अधिक काळ सेवा पूर्ण झालेल्या राज्यभरातील २६७ निरीक्षक व विनंती केलेल्या २१५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना त्वरित नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी घटकप्रमुखांनी कार्यमुक्त करावे,
असे आदेश महासंचालकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)