महिन्याने परतला, धो धो बरसला; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शिवार पुन्हा फुलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:44 AM2023-09-09T07:44:20+5:302023-09-09T07:44:36+5:30

दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

After almost a month, the rains came again; Shiwar flourished again in most of the districts of the maharashtra | महिन्याने परतला, धो धो बरसला; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शिवार पुन्हा फुलले

महिन्याने परतला, धो धो बरसला; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शिवार पुन्हा फुलले

googlenewsNext

जळगाव/नाशिक : जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव व पारोळा या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पारोळा तालुक्यात एकाच रात्री तब्बल ८३ मिमी. पाऊस झाला आहे. यासह भडगाव तालुक्यात ७५, तर अमळनेर तालुक्यात ६५ मिमी. पाऊस झाला आहे. पाचोरा व एरंडोल तालुक्यातही जोरदार पावसाने धुवून काढले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात एकूण ४८ मिमी. पाऊस झाला होता, तर सप्टेंबर महिन्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी एकूण ४९ मिमी पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात एकाच रात्री एकूण ३६ मिमी. पाऊस झाला आहे. बुधवारी जिल्ह्यात १३ मिमी. पाऊस झाला होता. ६ व ७ सप्टेंबर या दोन दिवसात जिल्ह्यात ४९ मिमी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पावसाच्या सरासरीत ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ६२ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अजुनही  प्रतिक्षा कायम आहे.

नाशिकच्या चार धरणांतून विसर्ग सुरू 
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गोदावरी नदीत बस अडकल्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील चार धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून ३०० क्यूसेक, कडवा धरणातून १६९६ क्यूसेक, पालखेड धरणातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातूनही १०४० क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. 

खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू
देवळा (नाशिक) : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून केदा रवींद्र नामदास या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खामखेडा येथे गुरुवारी दुपारी घडली. खामखेडा येथे अनेक वर्षांपासून स्थायिक झालेले नामदास कुटुंबीय परिसरात मेंढी पालन करून उदरनिर्वाह करतात. रानात मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर दुपारी  नामदास कुटुंबीयांना केदा दिसला नाही. त्याचा मृतदेह परिसरातील खड्ड्यात बुडालेला आढळून आला.

वार्षिक सरासरी ओलांडली
नांदेड जिल्ह्यात २४ तासात सरासरी १७.५० मिलिमीटर पाऊस झाला. बिलोली तालुक्यामध्ये आदमपूर मंडळामध्ये २४ तासात ६७.३० मिलिमीटर पाऊस झाला असून, प्रशासनाने अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक मानला जात असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद आणि अर्धापूर या तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.

मराठवाड्याला तूर्तास दिलासा!
लातूर जिल्ह्यात सर्वत्र २४ तासांत १३ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पाची पाणीपातळी तीन सेंटिमीटरने वाढली आहे. 
परभणी, हिंगोली, बीड,जालना जिल्ह्यात गुरुवारपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस सुरुच होता. छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यातही जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही दोन दिवस सर्वदूर पाऊस पडत असून  विष्णूपुरी धरण ८४ टक्के भरले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात रिपरिप 
कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, कागल तालुक्यात पावसाची भुरभुर होती. दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. धरण क्षेत्रात पाऊस असला तरी त्याला जोर नव्हता. सांगली जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या. इस्लामपूर, शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातही सरी पडल्या. सातारा जिल्ह्यात दहा दिवसांनतंर कोयना धरण क्षेत्रात पाऊस झाला. महाबळेश्वरला सर्वाधिक ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सोलापूर जिल्ह्यातही पाऊस झाला. 

कोकणात दमदार पुनरागमन
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपर्यंत संततधार सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

Web Title: After almost a month, the rains came again; Shiwar flourished again in most of the districts of the maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.