Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:05 AM2024-10-18T11:05:08+5:302024-10-18T11:08:01+5:30
Sharad Pawar : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली, या हत्येनंतर आता केंद्रीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
Sharad Pawar ( Marathi News ) : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या हत्येनंतर आता केंद्रीय यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्रीय यंत्रनेने राज्यातील आढावा घेतला आहे. यानंतर आता केंद्रीय यंत्रनेने खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता केंद्रीय यंत्रणा खासदार शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी संपर्क साधणार आहे. याआधीही केंद्राने खासदार शरद पवार यांना झेडप्लस सुरक्षा दिली होती, पण ती सुरक्षा पवार यांनी नाकारली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व इथं काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती. या हत्येची जबाबदारी सोशल मिडिया पोस्टवरुन बिश्नोई टोळीने स्विकारली. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विधानसभा निवडणुकांच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता देशातील केंद्रीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
महाराष्ट्रात काही दिवसात विधानसभा निवडणूका होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांनी सुरक्षा आढावा घेतला. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत पुन्हा एक विनंती करण्यात येणार आहे.
शरद पवारांनी याआधी केंद्राची झेड प्लस सुरक्षा नाकारली
काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. पण पवार यांनी सुरक्षा नाकारली होती. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. मात्र आता ही सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला होता.
सुरक्षा दलाचे वाहन घेण्यासही पवारांनी नकार दिला होता. सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. १५ सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली होती. मात्र पवार यांनी सुरक्षा नाकारली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणा आग्रह करणार असल्याचे बोलले जात आहे.