"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:46 PM2023-07-11T15:46:27+5:302023-07-11T15:47:10+5:30
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला.
उद्धव ठाकरेंच्या एका विधानामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. सोमवारी नागपुरातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांसह नेत्यांनी ठाकरेंच्या विधानाचा निषेध केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत ठाकरेंवर बोचरी टीका केली. याला उत्तर देताना उबाठा पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर पलटवार केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांना अंबादास दानवेंनी चार प्रश्न विचारले असून कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर बावनकुळे यांनी या प्रश्नांची उत्तर द्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
अंबादास दानवेंचे बावनकुळेंना प्रश्न
- प्रत्येकवेळी सरकार स्थापनेसाठी मातोश्रीच्या उंबरठ्यावर का येत होतात?
- मोदींजींच्या चेहऱ्याशिवाय ६३ आमदार निवडून आणून दाखवणाऱ्या माणसाशी सख्य ठेवण्यास का तुमच्या पक्षाची धडपड होती?
- वयच प्रमाण मानायचे तर फडणवीस यांच्यापेक्षा कमी वयाची माणसे आमदार, खासदार, नगरसेवक म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभागृहांत पाठवले, हे विसरून कसं चालेल?
- तुमचे नेते स्वतःचे करियर घडवत होते, कारण त्यांना स्वतःला मोठे व्हायचे होते. उद्धव ठाकरे यांनी माणसं मोठी केलीत. जी रेडिमेड तुम्ही नेलीत आणि सरकार बनवले? हे कसं विसरलात?
कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर...@cbawankule जी, याचे उत्तर पण द्या!
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 11, 2023
१. प्रत्येकवेळी सरकार स्थापनेसाठी मातोश्रीच्या उंबरठ्यावर का येत होतात?
२. मोदींजींच्या चेहऱ्याशिवाय ६३ आमदार निवडून आणून दाखवणाऱ्या माणसाशी सख्य ठेवण्यास का तुमच्या पक्षाची धडपड होती?
३. वयच प्रमाण…
उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे सत्ताधारी भाजपा आक्रमक झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी सत्ताधारी भाजपाने ठाकरेंच्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलने केली. भाजपा नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या विधानाचा निषेध केला. याबद्दल ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले, "कलंक शब्दावरून एवढे आक्रमक होण्याचे कारण काय? कारण सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेला कारभार हा महाराष्ट्रासाठी एक कलंकच आहे. तो लावणं त्यांनी थांबवावं. भाजपच्या सरकारनं लोकांच्या दारी जावं, पण घरातल्या लोकांचा तळतळाट घेऊन येऊ नये."