"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:28 PM2024-06-01T15:28:25+5:302024-06-01T15:33:42+5:30

Amol Mitkari : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बारातमीमधल्या सभेचा किस्सा सांगितल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

After BJP MP Medha Kulkarni narrated story of meeting in Baratami now Amol Mitkari responded | "एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार

"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार

Amol Mitkari vs Medha  Kulkarni : बारामतीमध्ये अमोल मिटकरांसोबत स्टेजवर बसण्यास नकार दिल्याचा किस्सा सांगत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी टीका केली होती. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या विधानाबाबत आता आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  विनाकारण कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही, असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना आता मिटकरी यांनी मेधा कुलकर्णींचं वक्तव्य संविधान बदलांच्या चर्चांना बळ देणारं असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

पुरोहितांची, मंत्रांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसह मी स्टेजवर बसणार नाही अशी भूमिका मी घेतली होती असं सांगत मेधा कुलकर्णींनी अमोल मिटकरींवर टीका केली होती. सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सत्कार मेधा कुलकर्णींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरींबाबत एक किस्सा सांगितला. यावरुन आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण अमोल मिटकरी यांनी एका समाजाला खुश करण्यासाठी मेधा कुलकर्णींनी हे विधान केल्याचे म्हटलं आहे. 

काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?

"अमोल मिटकरी हे बारामतीतल्या एका कार्यक्रमात स्टेजवर येणार होते. मी त्या स्टेजवर जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर अमोल मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची म्हणा, पण उगाच काही ऐकून घेणार नाही. ब्राह्मण समाज अतिशय साधा आहे. मात्र विनाकारण कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही. पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्ट करणारे अमोल मिटकरी व्यासपीठावर येणार आहेत हे समजल्यावर मी ठाम भूमिका घेतली," असा किस्सा मेधा कुलकर्णी यांनी सांगलीतल्या कार्यक्रमात बोलताना सांगितला.

मेधा कुलकर्णींच्या या विधानानंतर अमोल मिटकरी यांनी टीव्ही९ सोबत बोलताना अशा वक्तव्याने राज्यघटनेवरील शंकेला दुजोरा मिळेल असं प्रत्युत्तर दिलं आहे. "लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहं भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा कुणी व्यक्ती सदस्य होतो त्यावेळी त्याला जी शपथ दिलेली असते ती महत्त्वाची असते. खासदारकीची शपथ दिल्यानंतर तो सदस्य कुठल्याही एका समाजाचा राहात नाही तर तो देशाचा होतो. जर शपथ घेतल्यानंतर आपण एका समाजापुरते आहोत असं कुणी वागत असेल तर भारतीय संविधानाच्या विचारधारेला ते छेद देण्यासारखं आहे. असाच प्रकार सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला," असं अमोल मिटकरी म्हणाले.

"इतक्या दिवसांपूर्वीचं वक्तव्य त्यांनी उकरुन काढलं आणि टाळ्या मिळवल्या. एका पदावर असताना एका समाजासाठी काम करत असतील तर हा भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्त्वाला छेद देण्याचा प्रकार आहे. जर असंच चालू राहिलं तर जनतेच्या मनात जी शंका राज्यघटनेबाबत येते आहे त्याला अधिकृत दुजोरा मिळेल. त्यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य साफ चुकीचं आणि खोटं आहे. समाजाची दिशाभूल करणारं आहे, स्टेजवर त्या आल्या नव्हत्या असं नाही त्या आहेत हे कळल्यावर मी गेलो नव्हतो,” असेही अमोल मिटकरी म्हणाले.
 

Web Title: After BJP MP Medha Kulkarni narrated story of meeting in Baratami now Amol Mitkari responded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.