नोटा रद्द झाल्यानंतर रुग्णालयात मोफत भोजन सुविधा
By Admin | Published: November 15, 2016 09:13 AM2016-11-15T09:13:20+5:302016-11-15T09:13:20+5:30
सध्या पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळे लोकांचे हाल होत आहे.उदरभरणाच्या या यज्ञकर्मामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आधार मिळाला आहे.
रमाकांत पाटील, ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. १५ - सध्या पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळे लोकांचे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लबच्यावतीने जिल्हा रुग्णालयात मोफत भोजन सुविधा सुरु करण्यात आली आहे. उदरभरणाच्या या यज्ञकर्मामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आधार मिळाला आहे.
पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयानंतर शासकीय रुग्णालयात या नोटा १४ नोव्हेंबरपर्यंत स्विकारल्या जातील असे सरकारने जाहीर केले. असे असले तरी या नोटा रुग्णांच्या वैद्यकीय सेवेचा खर्च अथवा औषधीसाठी स्विकारल्या जातात. परंतु रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना मात्र दैनंदिन व्यवहारासाठी अडचणी येत आहेत.
बाहेर खानावळीत जेवणासाठी सुटे रुपये द्यावे लागतात. परंतु त्यांच्याकडे ५०० किंवा हजाराची नोट असल्याने बहुतांश ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचे जेवणाचे हाल होतात. या पार्श्वभूमी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात लायन्स क्बलतर्फे सुरू करण्यात आलेल्या मोफत भोजन सुविधेचा रुग्णांचे नातेवाईक लाभ घेत आहेत.
नंदुरबारचे जिल्हा रुग्णालय हे शहरापासून तीन किलो मीटर अंतरावर आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणासाठी रिक्षाने शहरात यावे लागते. परिणामी रिक्षा भाडे व जेवणाचेही सुटे पैसे असा प्रश्न असतोच. आजच्या स्थितीत ही सर्वात अवघड बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर या सुविधेचे रुग्णांनी स्वागत केले आहे.
यासंदर्भात क्लबचे अध्यक्ष आनंद रघुवंशी यांनी सांगितले की, रोज सायंकाळी साडेसहा वाजता स्वत: जावून रुग्णांना भोजनाचे वाटप करतो. जेवण बनविण्यासाठी महिला बचत गटाला ठेका दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही संख्या वाढली असून सध्या १७५ ते २०० रुग्णांच्या नातेवाईक त्याचा लाभ घेत आहेत. ५०० आणि हजाराच्या नोटा बंद झाल्यामुळे या सुविधेबाबत रुग्णांच्या नातेवाईकांना मोठाचा दिलासा मिळाला आहे.