लिंंगपरिवर्तनानंतर दाम्पत्याचा छळ सुरूच
By admin | Published: August 2, 2016 03:15 AM2016-08-02T03:15:41+5:302016-08-02T03:15:41+5:30
ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजातील दोन मित्रांचे एकमेकांवर प्रेम जडले.
शशी करपे,
वसई- ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजातील दोन मित्रांचे एकमेकांवर प्रेम जडले. प्रेमाखातर एकाने लिंग परिवर्तन करून घेतल्यानंतर दोघे विवाहबद्ध झाले. मात्र, दोघांच घरातून विरोध होत असल्याने दोघांनीही आपापल्या धर्माचा त्याग करून मुंबईतून थेट नालासोपाऱ्यात येऊन संसार थाटला. मात्र, याठिकाणीही स्थानिकांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे दोन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न झाला.
गोरेगाव येथील एका कॉल सेंटरमध्ये जेम्स सेमसन फ्रान्सिस आणि रिझवान खान काम करीत असताना दोघांची घट्ट मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निणर्य घेतला. त्यासाठी जेम्सने लिंंगबदल करून स्त्रित्व स्विकारले. या दोघांच्या निर्णयाला दोघांच्या कुटुंबीयांकडून तीव्र विरोध सुुरु झाला. कुटुंब आणि समाजातून होणाऱ्या विरोधाला न जुमानता दोघांनीही लग्न केले. त्यासाठी दोघांनीही आपापल्या कुटुंबाचा आणि धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्विकारला. धर्मांतरानंतर लिंंगबदल केलेला जेम्स कालिका आर्या झाली. तर रिझवान खान रामश्री आर्या झाला. पण, लग्नानंतर सामाजिक आणि कौटुंबिक त्रास होत असल्याने कालिका आणि रामश्री यांनी नालासोपाऱ्यात येऊन आपला संसार थाटला.
नालासोपाऱ्यात येऊन काही दिवस लोटल्यानंतर येथील एका टोळक्याने दोघांना त्रास द्याला सुरुवात केली आहे. घरातून बाहेर पडले की चौकातील एक टोळके तंच्यावर शेरेबाजी करीत असते. वारंवारच्या टिंंगलटवाळीला वैतागून कालिकाने दोन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. दोघांनी न्यायासाठी आता पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, टोळक्या पोलिसांच्या हाती लागत नाही. दुसरीकडे, टोळक्यांची शेरेबाजी अद्यापही सुरु असल्याने समाजातून सुरु असलेल्या छळाला दोघेही त्रस्त झाले आहेत.
नैसर्गिक कारणामुळे लिंंग परिवर्तन करुन जेम्सनें कालिका बनण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मित्रासोबत लग्न केले. मात्र, समाजात अद्याप या विवाहाला मान्यता नसल्याने कालिका आणि रामश्रीचा मानसिक छळ सुरुच राहिला आहे.
एकीकडे घरच्यांचा आधार नाही दुसरीकडे समाजाने वाळीत टाकण्याचा प्रकार होत असल्याने त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. पोलिसांचा आधार घेतल्यावर तर समस्या आणखी वाढल्या आहेत.