भुजबळांनंतर आता विजय वडेट्टीवारांचाही मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 05:05 PM2023-11-07T17:05:19+5:302023-11-07T17:07:13+5:30

मी ओबीसी आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमची मागणी आहे असं वडेट्टीवार म्हणाले.

After Chhagan Bhujbal, now Vijay Vadettivar is also opposed to giving Kunbi reservation to the Maratha | भुजबळांनंतर आता विजय वडेट्टीवारांचाही मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध

भुजबळांनंतर आता विजय वडेट्टीवारांचाही मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध

मुंबई – राज्य सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, प्रत्येकजण वेगवेगळी भूमिका मांडतो, पण सरकार म्हणून भूमिका काय? मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. ओबीसी नेते म्हणून भुजबळ जी भूमिका मांडतायेत, ती स्वाभाविक ओबीसी म्हणून माझीही भावना आहे. तुम्ही ज्या प्रकारे सरकार म्हणून हे प्रकरण हाताळतायेत, मराठवाड्यापुरती मर्यादा असताना त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जीआर काढला. आता सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी होतेय त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे आहे असं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, काही आमदारांनी मंत्रालयाला कुलुप लावले. सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरकार म्हणजे नियंत्रण चुकलेले जहाज आहे, ते बुडण्याच्या स्थितीत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसीबाबत सरकारची भूमिका काय? तुम्ही आपसांत भांडवून हा महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा आहे का? महाराष्ट्रात आग लावायची आहे का? मराठाविरुद्ध ओबीसी उभा करून तुम्ही महाराष्ट्राची तिजोरी साफ करण्यासाठी टपून बसला आहात का? सरकारची तिजोरीत खणखणाट आहे. मुंबई महापालिकेच्या FD संपल्या, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. महाराष्ट्रात लूट सुरू आहे. असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मी ओबीसी आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांचीही मागणी तीच आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तेच सांगितले. सर्वपक्षीय बैठकीत ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देणार नाही असं म्हटलं. आम्हाला ओबीसी नेत्यांना टार्गेट केले गेले, धमक्या येऊ लागल्या. ओबीसीत आल्यानंतर सगळं आलबेल होणार असं वाटतंय, अनेक जातींना स्वत:ची घरे नाही, इतकी वाईट अवस्था आहे. वाड्यापाड्यावर ८ दिवस पाणी येत नाही. सर्वाधिक आत्महत्या विदर्भात होतात, ते कोण तर ओबीसी आहे. ओबीसीमुळे सर्वकाही मिळते असा गैरसमज आहे. तुम्हाला आरक्षण हवं तर वेगळा प्रवर्ग घ्या, ५० टक्क्यांतील आतमध्ये आरक्षण कसं मिळेल. गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे. सरकार भूमिका स्पष्ट करत नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण दुषित होतंय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान, मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम करतायेत, तसं ओबीसी नोंदी शोधण्याचं काम करून श्वेतपत्रिका काढावी. ओबीसी समाजाला लाभापासून वंचित राहावे लागते. ओबीसीवर श्वेतपत्रिका काढावी अशी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याला १०० टक्के विरोध आहे. सरकारने स्पष्टता आणली पाहिजे हा वाद वाढू नये असा तोडगा काढला पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. शैक्षणिक, सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्यांना आरक्षण द्या, सरकार वाद वाढवतंय. दोन समाजात दुही निर्माण करतायेत. एकाच मंत्रिमंडळाचे २ मंत्री वेगवेगळी भूमिका घेतात. महाराष्ट्राला अस्थिर होण्याच्या परिस्थितीतून बाहेर काढावे अशी आमची मागणी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

Web Title: After Chhagan Bhujbal, now Vijay Vadettivar is also opposed to giving Kunbi reservation to the Maratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.