‘स्वच्छ महाराष्ट्र’नंतर ‘स्वस्थ महाराष्ट्र’

By admin | Published: July 12, 2016 03:45 AM2016-07-12T03:45:05+5:302016-07-12T03:45:05+5:30

स्वच्छ महाराष्ट्रनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्वस्थ महाराष्ट्र मिशन राबविण्यात येणार आहे. शासकीय यंत्र

After 'Clean Maharashtra', 'Healthy Maharashtra' | ‘स्वच्छ महाराष्ट्र’नंतर ‘स्वस्थ महाराष्ट्र’

‘स्वच्छ महाराष्ट्र’नंतर ‘स्वस्थ महाराष्ट्र’

Next

यदु जोशी,  मुंबई
स्वच्छ महाराष्ट्रनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्वस्थ महाराष्ट्र मिशन राबविण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणा, सीएसआर फंड, खासगी रुग्णालये आणि नामवंत डॉक्टर यांच्या सहकार्याने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात गेली अनेक वर्षे भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन यशस्वीरीत्या करणारे गिरीश महाजन हे वैद्यकीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर आता या मिशनची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जळगाव, यवतमाळ आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये अलीकडेच प्रायोगिक तत्त्वावर अशी शिबिरे घेण्यात आली. तिन्ही शिबिरांना मुख्यमंत्री स्वत: उपस्थित होते. त्यानंतरच ‘स्वस्थ महाराष्ट्र’ची संकल्पना पुढे आली आहे.
नामवंत कंपन्या सीएसआर फंडातून राज्याचे आरोग्य सुधारण्यासाठी योगदान देण्यास इच्छुक असून त्यात टाटा, अंबानींसारख्या उद्योगपतींचादेखील समावेश आहे. वर्षभरात तीन हजार कोटी रुपये सीएसआर फंडातून उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. टाटा ट्रस्टने आरोग्य सुविधांसाठी भरीव अर्थसाहाय्य देण्यास आधीच सुरुवात केली आहे. स्वत: रतन टाटा त्यात जातीने रस घेत आहेत.
आरोग्य शिबिरे ही सोपस्कारापुरती नसतील. त्यासाठी एक यंत्रणा उभारली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी त्यासाठी अमलात आणलेला पॅटर्न राबविला जाईल. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर तीन आशा वर्कर आणि तीन कार्यकर्त्यांची एक टीम असेल. प्रत्येक केंद्रात सात दिवसांचे आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल आणि शस्त्रक्रिया वा पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची यादी तयार केली जाईल. अशाच रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या आरोग्य शिबिरांसाठी पाठविले जाईल. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यांच्यावर जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वा खासगी रुग्णालयांमध्ये त्या करण्यात येतील आणि तेथे ती सुविधा नसेल तर जवळच्या विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी वा मुंबईला रुग्णांना पाठविण्यात येणार आहे. सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात झालेल्या शिबिरांतून किती रुग्णांना फायदा झाला याचा आढावा घेतानाच काही महिने वा वर्षांनंतर त्यांच्या स्वास्थ्याबाबत नेमकी अद्ययावत संगणकीकृत माहिती ठेवणारी यंत्रणाही उभारली जाणार आहे. जळगावमध्ये यंदाच्या शिबिरात ७५ हजार रुग्णांपैकी सर्वांवर उपचार करण्यात आले. ५ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Web Title: After 'Clean Maharashtra', 'Healthy Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.