वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून मुलाने दिला बारावीचा पेपर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 07:13 AM2023-02-22T07:13:55+5:302023-02-22T07:14:39+5:30
वडिलांची अंत्ययात्रा निघाली, त्यांना खांदा दिल्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा बारावी परीक्षेचा इंग्रजी पेपर देण्यासाठी निघाला.
बांबवडे (जि. कोल्हापूर) : बारावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच वडिलांचे निधन झाले. मुलाने जड अंत:करणाने वडिलांवर अंत्यसंस्कार केले अन् बारावीचा पेपरही दिला.
चरण (ता. शाहूवाडी) येथे संभाजी श्यामराव शिसाळ यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांचा मुलगा विश्वजीत बारावीत असून, मंगळवारी त्याचा पहिलाच पेपर होता. मात्र, नातेवाईक व शेजाऱ्यांनी विश्वजीतला पेपर देण्यात काही अडथळा येऊ नये म्हणून अंत्यसंस्कार लवकर उरकले व त्याला चिखली (ता. शिराळा) येथील केंद्रावर परीक्षेसाठी वेळेत पोहोचवले. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून त्याने बारावीचा पेपर दिला.
चोपडा (जि. जळगाव) : वडिलांची अंत्ययात्रा निघाली, त्यांना खांदा दिल्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा बारावी परीक्षेचा इंग्रजी पेपर देण्यासाठी निघाला. वडिलांच्या अकाली निधनाचे दु:ख पचवतच या विद्यार्थ्याने हा पेपर दिला. दिग्विजय कमलेश पाटील (मंगरूळ, ता. चोपडा) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. येथील संजीवनीनगरमधील रहिवासी कमलेश विश्वनाथ पाटील (४८, मूळ मंगरूळ, ता. चोपडा) यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे सोमवारी दुपारी ३ वाजता निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी चोपडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलेश यांचा लहान मुलगा दिग्विजय हा बारावीला आहे. मंगळवारी त्याचा इंग्रजीचा पहिलाच पेपर होता. एकीकडे कायमचे हरवलेलं पितृछत्र, तर पुढ्यात उभी असलेली भवितव्य ठरवणारी परीक्षा, असा नियतीने त्याच्यासमोर खेळलेला दुहेरी डाव. परंतु, वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत, अंत्यसंस्कार आटोपले आणि दिग्विजयने चोपडा तालुक्यातील सत्रासेन गाठले. वडिलांना त्यांच्या मोठ्या मुलाने अग्निडाग दिला.