जसा बाप तशी लेक, शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ; गोपीचंद पडळकर सुप्रिया सुळेंवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:46 AM2024-09-06T11:46:14+5:302024-09-06T11:47:26+5:30
सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत फडणवीसांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर भाजपा आमदार पडळकरांनी पलटवार केला आहे.
मुंबई - "शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही..." या सुप्रिया सुळेंच्या विधानावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर संतापले आहेत. जरांगे, शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जातीचे, या लोकांचे राजकारण महाराष्ट्रातील लोकांना समजलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोललं पाहिजे. कारण त्यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात संभ्रम निर्माण केला जातोय असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीने कसं टार्गेट केलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय, तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचे, काही पत्रकारांना हाताशी धरायचे आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची. स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे आणि जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमतायेत असं विधान द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा देण्याआधी शाहू महाराजांच्या वारसांना यांनी कधीही खासदारकी दिली नव्हती असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय महाराष्ट्रात जे जातीवादाचं विष पेरलं जातंय त्याकडे जनता सुज्ञपणाने बघतेय. पवारांचा फॉर्म्युला आहे, पुरोगामीच्या बाता मारायच्या आणि जातीवादावर चर्चा घडवायच्या. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरलेत. ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोला. लहानपणापासून शरद पवारांकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, पवार हे जातीवादाचं विद्यापीठ आहेत. त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे तसं जसा बाप तशी लेक असा निशाणाही पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर साधला.
दरम्यान, अजित पवारांनाही सहानुभूती दाखवायची नाही असं पुढे जाऊन सुप्रिया सुळे सांगतात. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायेत आणि सुप्रिया सुळे स्वत:तील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायेत अशी खोचक टीकाही गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर केली.