दाभोलकरांनंतर कृष्णप्रकाश होते हिट लिस्टवर
By admin | Published: June 23, 2016 05:19 AM2016-06-23T05:19:13+5:302016-06-23T05:19:13+5:30
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश हे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या हिट लिस्टवर होते, अशी खळबळजनक माहिती समोर येत आहे. कृष्णप्रकाश हे सध्या व्हीव्हीआयपी सुरक्षा विभागाचे महानिरीक्षक आहेत
डिप्पी वांकाणी, मुंबई
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश हे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या हिट लिस्टवर होते, अशी खळबळजनक माहिती समोर येत आहे. कृष्णप्रकाश हे सध्या व्हीव्हीआयपी सुरक्षा विभागाचे महानिरीक्षक आहेत. हिंदू जनजागरण समिती त्यांना लक्ष्य करणार होती. सीबीआयने जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये कृष्णप्रकाश यांच्या छायाचित्रावर फुली मारल्याचे दिसून आले आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २00७ ते २0१0 या काळात सांगलीचे पोलीस अधीक्षक असताना कृष्णप्रकाश यांनी या संघटनेवर गुन्हे दाखल केले होते. गोवा पोलीस जेव्हा या संघटनेविरुद्ध पुरावे गोळा करीत होते तेव्हा गोवा पोलिसांनाही कृष्णप्रकाश यांनी सहकार्य केले होते. याच कारणास्तव ते या संघटनेच्या हिट लिस्टवर होते. त्यांनी सनातन प्रभात मासिकाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. भारतीय घटना व अल्पसंख्याकांविरुद्ध अपमानकारक लिखाण केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती.
दाभोलकर प्रकरणात सीबीआय लवकरच स्टेटस रिपोर्ट सादर करणार आहे. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी व नंतर ‘सनातन प्रभात’ या मासिकात प्रकाशित लेखांच्या प्रकरणात या लेखकांचा जबाब घेण्यात आला आहे. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी प्रकाशित एका छायाचित्रात दाभोलकर हे जमिनीवर पडलेले दिसत होते, तर हत्येनंतर प्रकाशित एका लेखात ‘चांंगली सुटका’ या आशयाचा मजकूर प्रकाशित झाला होता.