‘शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुरक्षेवर विचार करणे आवश्यक’
By admin | Published: July 1, 2017 03:01 AM2017-07-01T03:01:44+5:302017-07-01T03:01:44+5:30
मंजुळा शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने येरवडा कारागृहातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने येरवडा कारागृहातील स्थितीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले.
बाळू चौधरी उर्फ शिवाजी तुकाराम चौधरी (४१) याला पोलिसांनी एका गुन्ह्याप्रकरणी २०१४ मध्ये अटक केली, तेव्हापासून त्याला येरवडा कारागृहातच ठेवण्यात आले आहे. या कारागृहाच्या अमानवी स्थितीबाबत चौधरी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. अतिसुरक्षा असलेल्या अस्वच्छ आणि घाणेरड्या सेलमध्ये ठेवून कारागृह प्रशासन आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहेत, तसेच कारागृहाच्या नियमानुसार आपल्याला ज्या सुविधा मिळायला हव्यात, त्याही देण्यात येत नसल्याचा आरोप चौधरी याने याचिकेद्वारे केला आहे.
शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी कारागृहांच्या काराभाराबद्दल आणखी एक याचिका दाखल केली असून, त्यावरील सुनावणी अन्य खंडपीठापुढे सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली.
त्या याचिकेत आणि या याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये साधर्म्य असल्याने, ही याचिकाही त्याच खंडपीठापुढे वर्ग करावी, अशी विनंती शिंदे यांनी न्यायालयाला केली.
त्यावर न्यायालयाने त्याही याचिकेत (अन्य खंडपीठापुढे असलेली याचिका) कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे का? अशी विचारणा सरकारकडे केली.
‘शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे. आरोपी / कैद्यांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे,’ असे म्हणत, न्यायालयाने सरकारी वकिलांना याबाबत एका आठवड्यात सूचना घेण्याचे निर्देश दिले.