पराभवानंतर मुख्यमंत्री वेडेपिसे होतील - उद्धव ठाकरे
By admin | Published: February 20, 2017 07:31 AM2017-02-20T07:31:18+5:302017-02-20T07:37:09+5:30
सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख थापाडे असे करत पुन्हा एकदा त्यांना टार्गेट केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख थापाडे असे करत पुन्हा एकदा त्यांना टार्गेट केले आहे. महाराष्ट्राची गरज म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीस तात्पुरता टेकू लावला आहे हे विसरू नका, असा पुर्नउच्चारही त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री बेफाम झाले आहेत. उद्याच्या पराभवानंतर ते पुरते वेडेपिसे होतील. ढोंग व खोटेपणाचा कोथळा मुंबईसह महाराष्ट्राची जनता काढणार याविषयी आमच्या मनात शंका नाही. तुम्ही कितीही आपटा; विजय शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेनेच्या विजयासाठी मुंबई सज्ज आहे. महाराष्ट्र दक्ष आहे!, असे सांगत उद्धव यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेना विजयी होणार असा विश्वासही व्यक्त केला आहे.
नेमके काय आहे आजचे सामना संपादकीय
भाजप मंत्र्यांनो कोथळे सांभाळा!
कितीही आपटा, विजय शिवसेनेचाच!!
नेहमीप्रमाणे प्रचाराच्या तोफा थंड झाल्या आहेत. आता प्रतीक्षा प्रत्यक्ष युद्धाची म्हणजे मतदानाची आहे. अर्थात तोफा म्हणाल तर त्या फक्त शिवसेनेच्या. बाकीच्यांच्या हातात व तोंडात फक्त पिचकाऱयाच होत्या. काही लोक तर निव्वळ बुडबुडेच ठरले, पण आपल्या लोकशाहीत पिचकाऱया व बुडबुडय़ांनाही प्रसिद्धी मिळत असल्याने निवडणुकांत रंग भरले जातात. त्यात निवडणूक ‘मुंबई’ची असेल तर हे रंग अधिकच भरले जातात. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका व जिल्हा परिषदा मतदानासाठी सज्ज झाल्या आहेत, पण सगळय़ांचा डोळा आहे तो मुंबईवर. अर्थात अनेकांच्या वाकडय़ा डोळय़ांनी मुंबईचा अनेकदा घात केला आहे. जो उठतोय तो अफझलखानी विडा उचलतोय की, मुंबई घेणार म्हणजे घेणारच! जणूकाही मुंबई यांच्या बापजाद्यांनी आपले रक्त सांडून मिळवली आहे. आता प्रत्यक्ष बुळबुळीत भाजपवालेही अशा वल्गना करू लागले आहेत याची गंमत वाटते. मुंबईच्या नावाने रोज एक थाप मारली जात आहे. बरं हे ‘थापा’डे कोण? तर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही फक्त शिवसेनेच्या पाठिंब्यावरच टिकून आहे. हे उद्या मुख्यमंत्री म्हणून राहतील की नाही याविषयी अनिश्चितता असतानाही हे महाशय मुंबईचे भवितव्य घडवायला निघाले आहेत व त्यासाठी शिवसेनेकडे डोळे वटारून पाहत आहेत. शिवसेनेचे तेज व महाराष्ट्राचा इतिहास त्यांना माहीत नाही. या वटारलेल्या डोळय़ांचे पुढे काय होते याचा शोध त्यांनीच घेतलेला बरा. महाराष्ट्राची गरज म्हणून शिवसेनेने आपल्या खुर्चीस तात्पुरता टेकू लावला आहे हे विसरू नका. पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राज्याची जनता आपल्या पाठीशी आहे का, तर तीदेखील नाही. प्रचारासाठी गल्लीबोळ फिरण्याची वेळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर यावी,
हाच त्यांचा पराभव
आहे. मागच्या दोनेक वर्षांत तुम्ही रेटून विकासाची कामे केली म्हणताय ना? ही कामे खरोखरच दिसत असतील तर लोकांसमोर मतांसाठी कटोरा पसरण्याची गरज नाही. नरेंद्रभाई आणि देवेंद्र भौना घरबसल्या भरभक्कम मते विकासाच्या मुद्दय़ावर मिळायला हवी होती. पण कामाच्या नावाने ‘बोंब’ असल्याने मुख्यमंत्री जेथे जातील तेथे फक्त ‘रिकाम्या’ खुर्च्यांनी स्वागत होत आहे. जेथे त्यांच्याच भारतीय जनता पक्षाचे पाच-पाच आमदार आहेत त्या पुणे-नाशिकसारख्या शहरात फडणवीसांच्या सभेला 50-100 माणसं नसावीत याचे आम्हाला दुःखच होत आहे. शेवटी मुख्यमंत्रीपदाची ती अप्रतिष्ठा आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच सरकारच्या तोंडच्या वायफळ वाफांत लोकांना अजिबात रस उरलेला नाही हे आता पक्के झाले आहे. ‘चंबूगबाळे आवरून चालते व्हा’ असे आम्ही सरकारला सांगण्याआधीच रिकाम्या खुर्च्यांनी सरकारला नोटीस मारली आहे. आता तुम्ही सारवासारवी काहीही कराल हो. पुणेकरांची दुपारचे डुलकीबाज म्हणून खिल्ली उडवली. जर पुणे दुपारी झोपून राहिले असते तर केंद्रीय आर्थिक सर्वेक्षणाच्या यादीत पुण्याने वरचा क्रमांक पटकावला नसता. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे असंस्कृत राजकीय पक्षांच्या सभांवर बहिष्कार टाकून पुण्यनगरीने उच्च संस्कृतीचे रक्षणच केले आहे. ते तुमचे व्यंकय्या नायडू पुण्यात येतात व मुळा-मुठा नद्यांची नावे बदला. ही काय नावे आहेत? असे विचारून पुण्याच्या संस्कृतीचा अपमान करतात. मुळा-मुठा हा पुण्याच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा भाग आहे. पण सगळय़ांनीच ‘वेडा तुघलक’ व्हायचे ठरवल्यावर त्यांना येड पांघरून पेडगावला जा व तोंडास बूच मारून बसा असे सांगण्याचीही सोय उरलेली नाही. प्रचारातल्या पिचकाऱया, बुडबुडे असे जे आम्ही म्हणतो ते यालाच. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत या बुडबुडय़ांना
‘लाट’ असल्याचा भास
झाला होता. तो भास आता मुंबई-ठाण्यात, पुणे-नाशकात, विदर्भात संपून जाईल. राज्याची जनता एका चिडीतून मतदानास उतरेल. भंपकपणा आणि खोटारडेपणाचा पर्दाफाश करील. मुख्यमंत्री व त्यांचे परिवर्तन टोळीचे म्होरके हवेत तरंगत आहेत व ती हवा त्यांच्या मस्तकात गेली आहे. ते मस्तकही त्यांना जनतेसमोर जमिनीवर घासावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी अशी पिचकारी मारली आहे की, मुंबईकरांच्या विकासासाठी शिवसेनेने काय केले? भाजप हा पक्ष महापालिकेवर चालत नाही वगैरे वगैरे. अशी पिचकारी मारणे हे तर खोटारडेपणाचे टोक आहे. जणू मुख्यमंत्र्यांचा पक्ष हा चिंचोक्यांवर चालत असेल तर त्या पक्षाचे लोक जागोजाग दोन हजाराच्या गुलाबी नोटा वाटताना का पकडले जात आहेत? त्या पाकिस्तानातून आणलेल्या बनावट नोटा आहेत की काय? शिवसेनेने मुंबईत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तो डोंगर चढता चढता तुम्हाला धाप लागेल व तुम्ही खाली पडाल. मुंबईला रस्ते देऊ, पाणी देऊ, आरोग्यसेवा देऊ असे बुडबुडे आता उडवण्यापेक्षा मुंबईला तिच्या हक्काचे पावणेदोन लाख कोटी रुपये मिळवून देऊ असा ‘शब्द’ दिला असता तर तुमच्या थापांची धार थोडी कमी झाली असती. मुंबई महापालिकेने केलेल्या कामांचे ठेवा बाजूला, शिवसेनेने ती याआधीच केली आहेत. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून गेल्या दोनेक वर्षांत विकासाचे, लोककल्याणाचे एकतरी काम धडपणे करून दाखवले असेल तर सांगा! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून जमाना लोटला तरी त्या जागेवरचा साधा कचरा साफ झाला नाही, पण मतांसाठी रामदासबुवांच्या दाढय़ा कुरवाळण्याचे ढोंग काही संपत नाही. तुमचा पक्ष कुणाच्या पैशावर चालतो ते सध्या मोकाट सुटलेल्या काळय़ा पैशांच्या खऱया मालकांना विचारा. मुंबई-पुण्यातील ‘ट्रम्पस्’ टॉवर्स’वाल्यांना आणि
गुंडभरती करून
मुंबईचे अंडरवर्ल्ड करू पाहणाऱया ‘क्लीन चिट’वाल्यांना विचारा. पितांबर आणि सोवळं नेसून भ्रष्टाचार केला म्हणजे भाजपची गंगा शुद्ध होईलच असे नाही. शिवसेनेने मुंबईतल्या जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप स्वतः बिल्डर‘राज’ वाल्यांनी करावा हा येथील मराठी माणसांचाच अपमान आहे. आज मुंबईतील मराठी माणसांची घरेदारे वाचली आहेत ती फक्त शिवसेनेमुळेच. बिल्डरांबरोबर तुमची फ्रेंडली मॅच सुरू असताना दुसऱयांवर असे आरोप करता हे मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकण्यासारखेच आहे. शिवसेनाद्वेषाने पछाडलेल्यांनी इतके कोडगे, बेशरम, निर्लज्ज, तत्त्वशून्य तरी बनू नये. शिवसेनाप्रमुखांमुळेच मराठी माणूस आजही ताठ मानेने उभा आहे व लढतो आहे, हिंदुत्वाचा विचार तेजाने फडकतो आहे, पन्नास वर्षे मुंबई, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या ‘महापौर’ बंगल्यातील स्मारकास विरोध करणाऱया पिचकाऱया मारणे, हा तर रक्तपिपासूपणाचा कळस म्हणावा लागेल. महाराष्ट्राचे तुकडेताकडे होण्यापासून वाचवले ते शिवसेनाप्रमुखांनीच. त्यांचे योग्य स्मारक पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. शिवसेनाप्रमुखांचा स्वाभिमानाचा विचार असा मारू म्हटले तरी मारता येणार नाही. मुंबई-महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आता अंगार पेटला आहे व महाराष्ट्रात वादळ उठले आहे ते शिवसेनेच्या विचारांचे. मुख्यमंत्र्यांनी जाता जाता असे सांगितले की, भ्रष्टाचाऱयांचा आता कोथळा काढू. म्हणजे मंत्रिमंडळातील त्यांच्या भाजप सहकाऱयांच्या रक्तानेच मुख्यमंत्र्यांच्या हातातील सुरा रंगणार काय? भाजपच्या मंत्र्यांनो, आपापले कोथळे सांभाळाच. कारण मुख्यमंत्री थेट भ्रष्टाचाऱयांचे कोथळे बाहेर काढणार आहेत. मुख्यमंत्री बेफाम झाले आहेत. उद्याच्या पराभवानंतर ते पुरते वेडेपिसे होतील. कारण ढोंग व खोटेपणाचा कोथळा मुंबईसह महाराष्ट्राची जनता काढणार याविषयी आमच्या मनात शंका नाही. तुम्ही कितीही आपटा; विजय शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेनेच्या विजयासाठी मुंबई सज्ज आहे. महाराष्ट्र दक्ष आहे!