पराभूत होताच नगर‘सेवा’ बंद

By admin | Published: February 28, 2017 01:14 AM2017-02-28T01:14:14+5:302017-02-28T01:14:14+5:30

कचरा वाहतूक गाड्या, पाण्याचे टँकर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नगरसेवकांनी लगेचच बंद करून टाकले.

After the defeat, the city 'service' was closed | पराभूत होताच नगर‘सेवा’ बंद

पराभूत होताच नगर‘सेवा’ बंद

Next


पुणे : नगरसेवक असताना प्रभागातील काही भागांमध्ये स्वखर्चाने सुरू केलेल्या कचरा वाहतूक गाड्या, पाण्याचे टँकर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नगरसेवकांनी लगेचच बंद करून टाकले. नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर ही बाब उघड झाली. १५ पैकी किमान १० क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असा प्रकार झाला असल्याची माहिती मिळाली.
शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, तसेच पर्वती, लोकमान्यनगर, राजेंद्रनगर व अन्य काही परिसरांतील प्रभागांमध्ये असे प्रकार झाले आहेत. पालिकेच्या कचरा वाहतूक विभागाला एखाद्या प्रभागातील सर्व ठिकाणचा कचरा उचलणे शक्य होत नाही. काही भागांमध्ये नळाला पाणी येण्यात अनेक अडचणी असतात. त्या भागातील नागरिक साहजिकच संबंधित नगरसेवकांकडे याच्या तक्रारी करीत असतात. शहराच्या झोपडपट्टी तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या वसाहतींमध्ये प्रामुख्याने या प्रकारच्या समस्या असतात.
अधिकाऱ्यांकडे नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कचरा वाहतूक करणारी वाहने त्या परिसरात नियमित पाठवणे त्यांना शक्य होत नाही. कधी वाहने अपुरी, तर कधी चालकच उपलब्ध नाही, वाहन आहे तर कर्मचारी नाही, अशा अनेक अडचणी नगरसेवकांनाही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लक्षात येतात. नागरिक म्हणजेच मतदार दुरावला जायला नको, यासाठी काही नगरसेवकांनी यावर उपाय म्हणून स्वखर्चाने काही ठिकाणी कचरा वाहतूक करणारी वाहने पाठवायला सुरुवात केली. तीच नंतर कायम झाली. पाण्याचे टँकरही याच पद्धतीने काही नगरसेवकांनी पुरवले होते.
या सेवेच्या बळावरच त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. मात्र कुठेतरी काहीतरी चुकले व त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर लगेचच त्यांनी ही स्वखर्चाने केलेली सेवा बंद करून टाकली.
त्याआधी त्या भागातील नागरिकांना काही कळवलेही नाही. कचरा वाहतूक करणारी वाहने बंद झाल्यामुळे त्या परिसरात कचरा साचून राहू लागला. पाणी मिळत होते तिथे पाणी मिळेनासे झाले. पराभूत नगरसेवकाला सांगायचे कसे, म्हणून नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. तक्रारींची संख्या वाढू लागल्यावर अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तर त्यातून ही बाब उघड झाली.
।पालिकेची पर्यायी व्यवस्था
पालिकेने आता या परिसरात पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यासाठी त्यांना कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले. मुळातच अशा वाहनांची संख्या अपुरी आहे, चालक अडचणीच्या ठिकाणी जायचा कंटाळा करतात, वेळा पाळत नाही, सुट्या घेतात. हे सगळे सांभाळून अधिकाऱ्यांना नव्या वाहनांची व्यवस्था करावी लागली. पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. १५ पैकी किमान १० क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जुन्या नगरसेवकांनी सेवा बंद केल्या आहेत़

Web Title: After the defeat, the city 'service' was closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.