"देशात २०१४ पासून हिंदू ओळखले जायला लागले का?"; अंबादास दानवेंचा फडणवीसांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:18 PM2024-10-02T12:18:55+5:302024-10-02T12:25:02+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला देेवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ठाकरे गटाने पलटवार केला आहे.
Ambadas Danve on Devendra Fadnavis : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेला बसलेला फटका लक्षात घेऊन विधानसभेला त्या चुका टाळण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत. अमित शाह विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधत ते महाराष्ट्राला संपवण्यासाठी येत असल्याचे म्हटलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी आरशात चेहरा पाहून घ्यावा असं प्रत्युत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर आता ठाकरे गटाने पलटवार केला आहे.
नागपूरमधील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भाजपाकडूनही उद्धव ठाकरे यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं गेलं. हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती, ती पुसण्याचा प्रयत्न झाला होता. ५०० वर्षांनंतर तो प्रयत्न मोडून टाकणारे अमित शाह हे आमचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकदा आपला चेहरा आकशात पाहून घ्यावा, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.
आता फडणवीसांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. "हो का देवेंद्र फडणवीसजी? म्हणजे या देशातील हिंदू हे हिंदू म्हणून २०१४ सालापासून ओळखले जायला लागले का? मग या ५०० वर्षांच्या कालखंडात हिंदूंची ओळख जपणारे आणि प्रसंगी बलिदान देणारे वीर महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे झंझावाती नेते तुमच्या लेखी काल्पनिक पात्र आहेत म्हणजे!," असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
हो का @Dev_Fadnavis जी?
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 2, 2024
म्हणजे या देशातील हिंदू हे हिंदू म्हणून २०१४ सालापासून ओळखले जायला लागले का? मग या ५०० वर्षांच्या कालखंडात हिंदूंची ओळख जपणारे आणि प्रसंगी बलिदान देणारे वीर महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद,… pic.twitter.com/VYwL78mUkI
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
"अमित शाह आम्हाला संपवण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. मात्र आम्हाला केवळ जनता संपवू शकते. जनतेनं सांगितलं की, उद्धव ठाकरे घरी बस, तर मी घरी बसेन. मात्र हे मला दिल्लीवरून घरी बसायला सांगत असतील तर जनताच त्यांना घरी बसवेल," असे उद्धव ठाकरे यांनी नागपुरातल्या सभेत म्हटलं होतं.