कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर चर्चा; परिवहनमंत्री अनिल परब यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 09:40 AM2021-11-04T09:40:13+5:302021-11-04T09:40:22+5:30
बुधवारी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष परब यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्द्यांबाबत दिवाळीनंतर राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.
बुधवारी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष परब यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यापूर्वी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पूर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता व दिवाळी भेट एस. टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनासोबत देण्यात आल्याचे मंत्री परब यांनी दरेकरांना सांगितले.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करु नका, अशी विनंती परिवहन मंत्र्यांना केली. याबाबत परब म्हणाले की, आजअखेर अघोषित संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. तसेच तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे व सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असे आवाहन केले.