Maharashtra Political Crisis: ईडीकडून संजय राऊतांची झाडाझडती; आता एकनाथ खडसेंचे मोठे विधान, म्हणाले, “जेलमध्ये...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 10:11 AM2022-07-31T10:11:37+5:302022-07-31T10:13:37+5:30
Maharashtra Political Crisis: संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरू असताना, एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत.
Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यातच आता याप्रकरणी प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला असून, प्रत्यक्ष नाव न घेता, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अडचणीचा असल्याने वेगवेगळ्या चौकशीच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न आहे. मला जेलमध्ये टाकल्यावर यांच्यासाठी रान मोकळे आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या नाव न घेता, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. भोसरी जमीन गैरव्यवहारासंदर्भात सुरू असलेली चौकशी आता लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली आहे, यावर एकनाथ खडसेंनी भाष्य केले आहे.
आता ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे
भोसरी जमीन गैरव्यवहारासंदर्भात परत ही चौकशी लाचलुचपत विभागाने करावी, असे आता ऐकले आहे. भोसरीतील भूखंडाची चौकशी अनेक वेळा झाली आहे. झोटिंग समितीने चौकशी केली. पुण्याच्या लाचलुचपत विभागाचे चौकशी करून यामध्ये कुठलाही दोष नाही. कुठलाही भ्रष्टाचार नाही, अनियमितता नाही म्हणून हा एफआयआर रद्द करावा, यासाठी पुणे सत्र न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट दीड महिन्यापूर्वी दिला आहे. नाशिक लाचलुचपत विभागानेही या प्रकरणाची चौकशी करून यात कुठलेही तथ्य नाही, असा अहवाल दिला आहे. आता ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ईडी किंवा इतर चौकशीच्या माध्यमातून मला अडचणीत आणण्याचा, छळण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशींमध्ये निर्दोष निघालो आहे. मात्र असे असतानाही पुन्हा वेगवेगळ्या चौकशांच्या माध्यमातून मला अडकवले जात आहे. आता कोणतीही चौकशी झाली तरी मला विश्वास आहे की या चौकशीमध्ये कुठलेही तथ्य नसेल. तरीही नव्याने शोधण्याचा प्रयत्न करून खोट्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न झाला तर सांगता येत नाही. कितीही प्रकारच्या चौकशा केल्या तरी त्यातून निर्दोष सुटेल, असा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.