एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा! फेर तपासाचा न्यायालयाने दिला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 06:25 AM2022-10-23T06:25:55+5:302022-10-23T06:26:06+5:30
भूखंडाचे बाजारभावानुसार मूल्यांकन अधिक असताना ते कमी किमतीत खरेदी केले. तसेच शासनाची स्टॅम्प ड्यूटीदेखील भरण्यात आली नव्हती, असा ठपका ठेवण्यात आला.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याभोवती पुन्हा ‘एसीबी’च्या चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुण्याच्या भोसरी जमीन खरेदी-विक्रीप्रकरणी गैरव्यवहाराबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाने येथील बंद गार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात येथील जिल्हा सत्र न्यायालयाने फेरतपासाचे आदेश पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे. याप्रकरणात शासनाच्या वतीने नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भूखंडाचे बाजारभावानुसार मूल्यांकन अधिक असताना ते कमी किमतीत खरेदी केले. तसेच शासनाची स्टॅम्प ड्यूटीदेखील भरण्यात आली नव्हती, असा ठपका ठेवण्यात आला. याबाबत फिर्यादीने पुन्हा न्यायालयाकडे अर्ज करत हा व्यवहार खोटा असल्याचा दावा केला आहे. शासनाकडून या प्रकरणात मिसर यांच्याकडून बाजू मांडण्यात आली.
दरम्यान, न्यायालयाने याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फेरतपास करण्याचे आदेश दिले आहे. सहायक पोलीस आयुक्त सीमा आडनाईक यांच्याकडे हा तपास सोपविण्यात आला आहे, अशी माहिती अजय मिसर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.