"तुमच्याशिवाय अडलं नाही"; शरद पवार गटात जाणार म्हणणाऱ्या खडसेंना भाजपचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 02:26 PM2024-09-02T14:26:20+5:302024-09-02T14:27:21+5:30
मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Eknath Khadse on BJP : आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंगवरुन राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्टवादी शरद पवार गटातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरची चर्चा रंगल्यानंतर एकनाथ खडसेंनी केलेल्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे. भाजपामध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे खडसेंनी म्हटलं आहे. खडसेंच्या या विधानानंतर आता भाजपनेही याबाबत भाष्य केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वाढदिवासानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आले होते. त्यानंतर वेगळीच चर्चा सुरु झाली. या चर्चेवर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं. एकनाथ खडसेंच्या या विधानावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.
"भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती मी भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. पण, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही," असे खडसे यांनी म्हटले आहे.
प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर
"लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. जळगाव रावेरच्या रक्षा खडसे आणि दुसऱ्या स्मिता वाघ या दोन्ही जागा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडून आणल्या. त्यामुळे एकनाथ खडसेंशिवाय काही अडल्याचे लोकसभेला दिसलं नाही," असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
"एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल निर्णय झालेला नाही. पण, जळगावमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा त्यांच्या प्रवेशावर आक्षेप आहे. भाजप ही काही ये जा करणाऱ्यांचा पक्ष नाही. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही पक्षात येणार आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही राष्ट्रवादीत जाणार हे अभिप्रेत नाही," असंही प्रवीण दरेकर म्हणाले.