निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादीत फारकत
By Admin | Published: March 3, 2017 03:24 AM2017-03-03T03:24:07+5:302017-03-03T03:24:07+5:30
काँग्रेसने निवडणुकीनंतर पुन्हा लोकशाही आघाडीत न राहता आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : निवडणुकीत घासाघीस करून एकदाची आघाडी करणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीनंतर पुन्हा लोकशाही आघाडीत न राहता आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही अवघ्या तीन नगरसेवकांच्या जोरावर उपमहापौरपदाचा उमेदवारी अर्जही काँग्रेसने दाखल केल्याने राष्ट्रवादी येत्या काही दिवसांत काँग्रेस कोणाच्या बाजूने झुकणार, याचा अंदाज घेणार आहे.
निवडणुकीत लोकशाही आघाडीला ३८ जागांवर यश मिळाले आहे. त्यानुसार, ही आघाडी निवडणुकीनंतरही कायम राहावी, यासाठी बुधवारी राष्ट्रवादीने कोकण विभागीय आयुक्तांकडे एकत्रित गटाची नोंदणी करण्यासाठी बोलावणे धाडले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनीही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकत्रित जाण्याचा सल्ला दिला होता. असे असतानाही काँग्रेसने पुन्हा घूमजाव केले आहे. आता राष्ट्रवादीने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल झाला आहे. यापूर्वीचा म्हणजेच २०१२ चा इतिहास तपासला असता काँग्रेसने सेनेला उघड अथवा छुपा पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता काँग्रेस त्याच पद्धतीने सेनेला पाठिंबा देणार का, याची चाचपणी राष्ट्रवादी यानिमित्ताने करणार आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी आपली पुढील दिशा ठरवणार आहे. (प्रतिनिधी)