अखेर पराभवानंतरच पायात घातली चप्पल
By admin | Published: February 24, 2017 02:19 AM2017-02-24T02:19:21+5:302017-02-24T02:19:21+5:30
पुरंदर तालुक्यातील बेलसर माळशिरस गटातील नाझरे क. प. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते संदीप चिकणे
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील बेलसर माळशिरस गटातील नाझरे क. प. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते संदीप चिकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेच जिल्हा परिषदेचे उमेदवार सुदाम इंगळे यांचा पराभव करण्याची गावचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात पायातील चपला उतरवून ‘इंगळेंचा पराभव करेन तेव्हाच पायात चपला घालीन,’ अशी शपथ घेतली होती. आज इंगळेचा दोन हजारांवर मतांनी पराभव झाला. सायंकाळी संदीप चिकणे यांनी नागेश्वरच्या मंदिरात जाऊन तेथील खारतोडेमहाराजांच्या उपस्थितीत पायात चपला घातल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसने ६ फेब्रुवारी रोजी बेलसर माळशिरस गटासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व हा गट गेली २० वर्षे ज्यांच्या ताब्यात होता त्या सुदाम इंगळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि या कार्यकर्त्याने ही शपथ घेतली. इंगळे यांचा पराभव करण्यासाठी घर सोडले. गटातील सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, युवा कार्यकर्त्यांना एकत्र करून इंगळे यांच्याविरोधात प्रचारात जुंपले. दिवसभर प्रचार करून घरी न येता नातेवाईकांकडेच मुक्काम करीत तब्बल १७ दिवस अनवाणी प्रचार केला. त्यांच्या या अशा शपथेची व प्रचाराची राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते खिल्ली उडवत होते. चेष्टा करीत होते. इंगळे यांचे कार्यकर्ते तर सतत डिवचत होते. यात त्यांना यश आले. आज सायंकाळी ५ वाजता ते गावात आले. गावातील युवकांनी त्यांची मिरवणूक काढली. थेट नागेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी खारतोडेमहाराजांच्या हस्ते चपलांचा जोड स्वीकारला व पायात घातल्या. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत याच गावाने सुदाम इंगळे यांच्या कन्या सारिकाताई इंगळे यांचा प्रचार केला होता.
गावानेही त्यांना त्या वेळी सुमारे ५०० चे मताधिक्य दिले होते. मात्र या वेळी इंगळे यांच्यावर कॉँग्रेसच्या उमेदवाराला १०० चे मताधिक्य या गावाने दिले आहे. पक्षाचा एक कार्यकर्ता असूनही सुदाम इंगळे यांनी मला व माझ्या कुटुंबाला गेली पाच वर्षे प्रचंड मनस्ताप व त्रास दिला. खोट्यानाट्या केसेसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे संदीप चिकणे यांनी सांगितले. मात्र तो अत्यंत धक्कादायकच ठरला आहे. (वार्ताहर)