गडचिरोली एन्काऊंटरनंतर जवानांनी धरला सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 10:29 AM2018-04-24T10:29:52+5:302018-04-24T10:29:52+5:30
एन्काऊंटरनंतर जवानांनीही मोठा जल्लोष केला. जवानांनी सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका धरला आहे.
गडचिरोली- महाराष्ट्रात जवळपास 40 वर्षांनंतर नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलानं सर्वात मोठी कारवाई केली आहे. रविवारी गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 16 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. यात काही उच्चपदस्थ कमांडर आणि महिला नक्षलींचा समावेश आहे. या एन्काऊंटरनंतर जवानांनीही मोठा जल्लोष केला. जवानांनी सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका धरला आहे.
एएनआयनं नाचणा-या जवानांचा व्हिडीओ शेअर केला. भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडगावपासून 7 किमी अंतरावरील कसनासूर जंगलात पोलिसांचे जवान गस्त घालत होते. नक्षल्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. धुमश्चक्रीनंतर काही नक्षलवादी पळाले. संध्याकाळपर्यंत 16 नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. सर्व मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले.
WATCH: Jawans celebrate after completing two successful encounters at two different locations in Gadchiroli. #Maharashtrapic.twitter.com/pSrSce6pAH
— ANI (@ANI) April 23, 2018
पोलिसांनी बंदुका व इतर साहित्यही जप्त केले. जवळपास पाच तास चकमक सुरू होती. चंद्रपूर आणि मध्य भारतातल्या शेजारील राज्यांत नक्षलवाद्यांच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा बलाच्या जवानांना तैनात केले होते. पोलिसांनी 2013मध्ये अहेरी तालुक्यातील गोविंदगावमध्ये 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. तर 2017मध्ये सिरोंचा तालुक्यातील कल्लाडे जंगलात सात नक्षलवाद्यांना ठार केलं होतं.