"हिंदू धर्माचा गर्व अन् अभिमान; मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 03:40 PM2024-01-22T15:40:27+5:302024-01-22T15:41:22+5:30

आज आनंदाचा क्षण आहे. खूप वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज प्रभू राम विराजमान झालेत असं जरांगे पाटलांनी सांगितले.

After getting Maratha reservation, will go to Ayodhya for Ram darshan - Manoj Jarange Patil | "हिंदू धर्माचा गर्व अन् अभिमान; मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार"

"हिंदू धर्माचा गर्व अन् अभिमान; मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार"

अहमदनगर - संपूर्ण देशाला ज्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतिक्षा लागून राहिलेली होती अखेर आज त्याची स्वप्नपूर्ती झाली. अयोध्येत प्रभू श्री राम विराजमान झालेत. संपूर्ण देशात आज आनंदोत्सव आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आम्हीही अयोध्येला राम दर्शनासाठी जाणार असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. नगरमधील राम मंदिरात जरांगे पाटलांनी दर्शन घेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद व्यक्त केला. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अहमदनगरमध्ये भगवान श्री रामाचे आशीर्वाद घेतले, दर्शन केले आणि पूजाही केली. आज भारतवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भगवान श्री राम अयोध्येत विराजमान होतायेत. हा भारतवासियांसाठी प्रचंड आनंदाचा दिवस आहे. हा आनंदाचा दिवस आम्ही अहमदनगरच्या राम मंदिरात साजरा केला. आज आनंदाचा क्षण आहे. खूप वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज प्रभू राम विराजमान झालेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साह आहे. हिंदू धर्माचा गर्व आणि स्वाभिमान आहे. प्रभू श्रीरामाकडे आरक्षणासाठी वेगळं साकडं घालू. आज आनंद व्यक्त केला. मराठा आरक्षण मिळाल्यावर अयोध्येला नक्की दर्शनाला जाणार. दणादण रेल्वे भरून अयोध्येला जातील असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं. 

पंतप्रधान मोदी झाले भावूक

अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज भगवान श्रीराम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आज आपले राम आले आहेत असं म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. "२२ जानेवारी ही कॅलेंडरवर लिहिलेली एक तारीख नाही. शतकानुशतकांच्या प्रतिक्षेनंतर आज आपले राम आले आहेत. माझा कंठ दाटून आला आहे, माझं मन अजूनही त्या क्षणात गढून गेले आहे. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत असं म्हणत पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title: After getting Maratha reservation, will go to Ayodhya for Ram darshan - Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.