जळगावात लग्नानंतर प्रियकराला मारहाण करून मुलीला घेवून नातेवाईक पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2017 11:37 PM2017-01-27T23:37:35+5:302017-01-27T23:37:35+5:30
कुंझर येथील प्रेमीयुगुलाने लग्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयात २९ नोव्हेंबर रोजी नोंदणी केली होती़ त्यानंतर वारंवार पाठपुरावा केला
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.27 : कुंझर येथील प्रेमीयुगुलाने लग्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयात २९ नोव्हेंबर रोजी नोंदणी केली होती़ त्यानंतर वारंवार पाठपुरावा केला असता येथील कर्मचारी, तसेच अधिकारी यांनी संगणकासह इतर अडचणी सांगून टाळाटाळ केली़ २७ रोजीनोंदणीनुसार कायदेशीर रित्या दोघांचा विवाह झाला़ मात्र यादरम्यान तरूणाला मारहाण करत मुलीला घेवून नातेवाईक पसार झाले़ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मुलीच्या नातेवाईकांनी लग्नाची माहिती दिल्याने प्रकार घडल्याचा आरोप प्रियकर तरूण योगेश ढिवरे केला आहे़ याबाबतची लेखी तक्रार ढिवरे यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिली आहे.
योगेश ढिवरे व निलीमा (मुलीचे बदललेले नाव) दोघे कुंझर एकाच गावात राहतात़ शाळेत असताना योगेशचे निलिमावर प्रेम जडले़ माध्यमिक शिक्षणानंतर दोघांनी पुढील शिक्षणासाठी चाळीसगावात येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला़ योगेश तृतीय वर्ष कला शाखेत शिकत असून त्याच महाविद्यालयात निलिमा शिक्षण घेत आहे़ एकाच महाविद्यालयात असल्याने दोघांच्या दररोजच भेटीगाठी होत होत्या़
आई-वडीलांना कळाली प्रेमकहानी
योगेश व निलिमाचे दिवसेंदिवस फुलत होते़ यादरम्यान एकेदिवशी दोघांच्या घरच्या मंडळींना त्याच्या प्रेमकहाणीची माहिती कळाली़ लग्नासाठी योगेशचा घरच्यांचा होकार होता मात्र निलिमाच्या कुटुंबियांकडून स्पष्ट नकार होता़ यानंतर त्यांनी मुलीला मारहाण केली़ व काही दिवसांनी मावशीकडे पाठविले़ याठिकाणाहून निलीमाचे व योगेशचे फोनवरून संभाषण सुरू होते़ यानंतर निलीमाला तिच्या कुटुंबियांनी मामाकडे पाठविले़
दोघांनी घेतला लग्नाचा निर्णय
दिवसेंदिवस त्रास वाढत होता, दोघे तणावात होते, एकमेकांशिवाय जगू शकणार नाही, अशी परिस्थिती असल्याने योगेशने लग्नाचा निर्णय घेतला़ आत्याकडे ाायचे असल्याचे सांगत निलीमा मांडळहून निघाली मात्र तेथे पोहचली नाही़ योगेशने सांगितल्याप्रमाणे ती नरडाणा येथे उतरली़ २९ नोव्हेंबर रोजी योगेश व निलीमा दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व विवाह नोंदणीसाठी संबंधित कार्यालयात नोंदणी केली़ २५ फेब्रुवारीपर्यंत केव्हाही लग्न करू शकतात असे कार्यालयाकडून सांगण्यात आले़ मात्र पाठपुरावा केला असता दुय्यम निबंधकाकडून टाळाटाळ केली जात होती असे योगेशचे म्हणणे आहे़ घरी गेल्यास वडील व नातेवाईक जिवंत सोडणार नाही, यामुळे निलीमाने घरी जाण्यास नकार दिला़ योगेश निलीमासह काही दिवस मुंबईला राहिला़
मुलीला घेवून जाणाऱ्या गाडीसमोर प्रियकर झोपला
नोंदणी केल्यानुसार योगेश-निलीमा यांनी २७ रोजी सकाळी ११ वाजता विवाह नोंदणी कार्यालय गाठले़ याठिकाणी येथील कर्मचाऱ्यांनी संगणकाची अडचण सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला़ येथील अधिकाऱ्याशी वाद झाल्यानंतर अखेर दुपारी विवाह पार पडला़ दोघांनी विवाह प्रमाणपत्रही घेतले़ यानंतर काही वेळातच निलीमाचे १० ते १५ नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात आले़ पार्किंगसमोर त्यांनी योगेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ मुलीला सोबत घेवून जाण्याचा प्रयत्न केला़ अखेर योगेश मुलीला घेवून जात असलेल्या जीपसमोर झोपला़ यादरम्यान त्याला बाजूला करत निलीमाला घेवून नातेवाईक रवाना झाले़ विवाह नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निलीमाच्या नातेवाईकांना माहिती दिली़ त्यामुळे दहा ते पंधरा जळगाव गाठत मारहाण केल्याचा आरोप योगेश ढिवरे याने लोकमतशी बोलताना केला़
पोलिसांच्या सतर्कतेने तरूणी ताब्यात
योगेश ढिवरे याने मित्रासमवेत तक्रारीसाठी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले़ प्रकाराबाबत येथील एसआय शिवाजी वराडे, करूणासागर जाधव यांनी वायरलेसवरून जिल्हाभरातील पोलीस ठाण्याना संदेश दिला़ त्यानुसार निलीमाला घेवून जात असलेले वाहन एरंडोल येथे अडविण्यात आले़ चालकाने दुसऱ्या वाहनाने नातेवाईक गेल्याचे पोलिसांना सांगितले़ अमळनेरला निलीमासह तिचे नातेवाईक असलेली चारचाकी पोलिसांनी पकडली़ निलीमा बेपत्ता असल्याबाबत मारवड ता़अमळनेर पोलिसात नोंद असल्याने त्यांना मारवड पोलीस ठाण्यात नेण्यात आले़ तेथील पोलिसांनी जिल्हापेठ पोलिसांना तरूणी मिळाल्याची माहिती दिली़ त्यावरून तरूणासह त्याचे नातेवाईक मारवडकडे रवाना झाले होते़ उशीरापर्यंत कारवाई सुरू होती़