अमेरिकेत पुन्हा अपमान झाल्यावर शाहरूखने मायदेशात परतायला हवे होते - उद्धव ठाकरे
By admin | Published: August 13, 2016 12:06 PM2016-08-13T12:06:51+5:302016-08-13T12:07:12+5:30
अमेरिकेत पुन्हा एकदा अपमान झाल्यानंतर शाहरुखने देशभक्ती दाखवत मायदेशात परतायला हवे होते असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याला अमेरिकेतील विमानतळावर पुन्हा एकदा अडवण्यात आल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखातून याच मुद्यावर भाष्य करत ' अमेरिकेत पुन्हा एकदा अपमान झाल्यानंतर शाहरुखने देशभक्ती दाखवत मायदेशात परतायला हवे होते' असे म्हटले आहे.
लॉस एंजल्स येथील विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याबद्दल शाहरूखने ट्विट करत नाराजी नोंदवली होती. यापूर्वीही शाहरूखला अमेरिकेत विमानतळावर थांबवून त्याची तपासणी करण्यात आली होती. शाहरुखला अमेरिकेतील विमानतळांवर वारंवार सुरक्षेच्या कारणांवरुन अडवले जाते आहे. मात्र तरीही सहिष्णू शाहरुख खान आपला अपमान करुन घेण्यासाठी अमेरिकेला जातो, असे म्हणत सामनामध्ये शाहरुखची खिल्ली उडवण्यात आली आहे. शाहरुखने हा अपमान सहन करण्यापेक्षा राष्ट्रभक्ती दाखवयला हवी होती. तुम्ही माझा अपमान करणार असाल, तर मी तुमच्या देशात पाऊल ठेवणार नाही, असा संदेश त्यामुळे अमेरिकेला मिळाला असता, असेही उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे.
तुम्ही माझा असा अपमान करणार असाल तर मला तुमच्या देशात पाऊल ठेवायचे नाही. हा पहा मी निघालो, आल्या पावली परत!’’ असा प्रखर स्वाभिमानी बाणा दाखवून शाहरुख महाशय हिंदुस्थानात परतले असते तर अमेरिकेचेच थोबाड फुटले असते व महासत्तेच्या तकलादू सहिष्णुतेचे बिंग फुटले असते, पण आमच्या बॉलीवूडकरांना स्वदेशावर सिनेमे काढायचे असतात व युरोप, अमेरिकेत जाऊन या अशा थपडा खायच्या असतात. वास्तविक खान मंडळींनी यातून एक धडा घेतला पाहिजे तो म्हणजे, ‘‘सारे जहां से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा!’’ शेवटी मातृभूमी हीच माता, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
तसेच देशातील सध्याच्या स्थितीवरुनही उद्धव यांनी तिन्ही खानांना सल्ला दिला आहे. तिन्ही खानांनी काश्मीरमध्ये हिंसाचार करणाऱ्या तरुणांना ट्विटरवरुन योग्य ती दिशा दाखवावी, असे त्यांनी म्हटले आहे.