‘कळसुबाई’ सर केल्यानंतर ‘आकाश’ची नजर आता ‘एव्हरेस्ट’वर

By admin | Published: August 12, 2015 11:12 PM2015-08-12T23:12:35+5:302015-08-12T23:12:35+5:30

त्याने आकाशाची उंची गाठण्याचे, आभाळाला हात लावण्याचे स्वप्न पाहिलेच. त्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

After 'Kisubai', 'Akash' is now seen on Everest | ‘कळसुबाई’ सर केल्यानंतर ‘आकाश’ची नजर आता ‘एव्हरेस्ट’वर

‘कळसुबाई’ सर केल्यानंतर ‘आकाश’ची नजर आता ‘एव्हरेस्ट’वर

Next

प्रकाश वराडकर-रत्नागिरी  घरची परिस्थिती अगदीच बेताची. शिक्षणाचा खर्च कसा करायचा, हा यक्ष प्रश्न. वडिलांचे कृपाछत्रही आधीच हरपलेले. साडेतीन ते चार हजार रुपये महिना पगारावर काम करणारा भाऊ घराचा पोशिंदा. या स्थितीत एखादे स्वप्न पाहायचे म्हणजे ते स्वप्नच राहण्याची भीती होती. तरीही त्याने आकाशाची उंची गाठण्याचे, आभाळाला हात लावण्याचे स्वप्न पाहिलेच. त्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांतून त्याने महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेले कळसुबाईचे शिखर सर केले. आता हे शिखर सर केल्यानंतर त्याची नजर लागली आहे ती एव्हरेस्टवर. हे शिखरही त्याला सर करायचे आहे. ही महत्त्वाकांक्षा असलेल्या आकाश प्रमोद पालकर या विद्यार्थ्याला एव्हरेस्ट सर करण्यासाठी आर्थिक मदतीचे पंख हवेत. ते नक्की मिळतील, अशी आशा त्याला आहे.
आकाश पालकर हा सध्या वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे बारावीमध्ये शिकत आहे. आडी शिरगाव येथे राहणाऱ्या आकाशचे वडील हयात नाहीत. आई गावामध्येच मोलमजुरी करते. त्यामुळे घरचे दोन वेळचे जेवण मिळविताना कसरत होते. या स्थितीत शिक्षणासाठी आर्थिक जुळवणी करतानाही नाकीदम येतो. तरीही आकाश व त्याच्या कुटुंबियांनी हार मानलेली नाही. बारावीत शिक्षण घेणारा आकाश टीआरपी, रत्नागिरी येथे संगणक शिक्षणासाठी जातो. त्यासाठीही त्याचे काका प्रशांत देऊ पालकर यांनी त्याला मदत केली आहे.
अपंगत्व असतानाही अरुनिमा सिन्हा यांनी एव्हरेस्ट सर केले. त्यांची त्याबाबतची चित्रफीत पाहून आकाशचे मनही एव्हरेस्टवर भिरभिरू लागले. त्याने एव्हरेस्टबाबत माहिती मिळविण्यास सुरूवात केली. त्यानंतर आकाशने चवेकर सर, नेत्रा ठाकुर, कुवारबावचे धीरज पाटकर यांच्याकडे आपली एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा व्यक्त केली. या सर्वांनी आकाशला खूप मदत केली. त्यानंतर आकाशने पहिला ट्रेक पनवेलमध्ये ठाकुरवाडी येथे केला. त्यावेळीही त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने दुसऱ्यांची मदत घेतली. नंतर दुसरा ट्रेक केला. राज्यातील सर्वात उंच म्हणजेच १६४६ मीटर उंच असलेले कळसुबाई शिखर सर केले. त्यावेळी झालेला आनंद हा आकाशने आकाशाला हात लावल्यासारखाच होता. त्यावेळीही आकाशकडे पैसे नव्हते. त्याला चुलते संतोष नारायण पालकर यांनी आर्थिक मदत केली. आता एव्हरेस्ट शिखर सर करायचे हे आकाशचे स्वप्न आहे, त्यासाठी तो झगडतो आहे.


आकाशची महत्त्वाकांक्षा आहे ती देशातील सर्वाेच्च असे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची. कळसुबाई शिखर सर केल्यानंतर त्याची ही महत्त्वाकांक्षा अधिक भक्कम बनली आहे. हे शिखरही सर करता येईल, असा त्याला आत्मविश्वास वाटतो आहे. मात्र, आर्थिक बाजू लंगडी असताना त्याच्या या महत्त्वाकांक्षेला, त्याच्या जिद्दीला आर्थिक बळाचे पंख कोण पुरविणार, असा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी तो आपल्या मित्रांपैकी कोणाचे पालक मदत करू शकतील काय, कोणी आर्थिक बळाचे पंख देईल काय, यासाठी सातत्याने धडपड करतो आहे. त्याच्या या ‘महत्त्वाकांक्षेचे एव्हरेस्ट’ शिखर सर करण्याचे बळ त्याला मिळो, हीच अपेक्षा त्याच्या मित्रांमधूनही व्यक्त होत आहे.

Web Title: After 'Kisubai', 'Akash' is now seen on Everest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.