लोकमतच्या वृत्तानंतर जळगावात २२०० फेरपरीक्षा उत्तीर्ण विदयार्थ्यांना मिळाला प्रवेश
By admin | Published: September 22, 2016 08:39 PM2016-09-22T20:39:09+5:302016-09-22T20:39:09+5:30
१० वी आणि १२ वीच्या वर्गात फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २२०० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २२ : १० वी आणि १२ वीच्या वर्गात फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २२०० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती आहे. यासंदर्भामध्ये ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
१० वीमध्ये फेरपरीक्षेत ११०८ आणि १२ वीमध्ये ११५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. आॅगस्टमध्ये निकाल जाहीर झाले होते. परंतु शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू झाले, फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागांचा प्रश्न यामुळे प्रवेश मिळत नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने दोनवेळा वृत्त प्रसिद्ध करून हा मुद्दा उपस्थित केला. त्यात १० वीमध्ये फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण संचालकांनी जि.प.ला पत्र दिले होते. तर उच्च शिक्षण संचालनालयानेही १३ वीच्या वर्गांसाठी १० टक्के जागा वाढविण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले होते. यानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये व जि.प.च्या अखत्यारितील उच्च माध्यमिक विद्यालयांना, कनिष्ठ महाविद्यालयांना जागा वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
१० सप्टेंबर २०१६ पर्यंत १३ वीच्या वर्गात १२ वीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही झाली असून, १३ वीमध्ये ११०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची माहिती आहे. तर १० वीच्या सर्व ११०८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. संबंधित विद्यालयांनी तशी नोंदणी केल्याचा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला.