जानकरांनंतर आणखी एक मित्रपक्ष भाजपावर नाराज; स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 08:52 AM2024-03-13T08:52:04+5:302024-03-13T09:34:29+5:30
मला हे सगळे माहिती आहे. नाक कसं दाबायचे, कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हेही माहिती आहे. आम्ही झुकत नाही असं कडू यांनी सांगितले.
नागपूर - एनडीएच्या बैठकीसाठी मी दिल्लीला गेलो होतो. जेव्हा एखादी निवडणूक लढतो तेव्हा प्रत्येक घटकाला विचारलं जाते ती भूमिका भाजपाची दिसत नाही. आम्हाला त्याची फार गरजही वाटत नाही. आम्ही महायुतीत आहे की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आमची लढण्याची तयारी झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात ३००-४०० उमेदवार आम्ही उभे करू असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, आम्ही स्वाभिमानी आहोत, कुणालाही कुणाचा पक्ष संपवण्याची ताकद नसते. कापसाचा भाव, घरकुल, मजुराचा प्रश्न आहेत. आम्ही कुणाला मतदान देतो ते पाहायला मिळावे यासाठी आम्ही अभियान राबवणार आहोत. गरज असते तर ४ फोन केले असते. विधान परिषदेची, राज्यसभेची निवडणूक असते तेव्हा आम्हाला फोन करून विचारले जाते. परंतु ते झाल्यानंतर कुणी विचारत नाही हे २० वर्षापासून अनुभवतोय. मला हे सगळे माहिती आहे. नाक कसं दाबायचे, कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हेही माहिती आहे. आम्ही झुकत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री शिंदेंसोबत आम्ही चर्चा करणार नाही. त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही चर्चा करू, पण आम्हाला चर्चेची गरज वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचा पक्ष मोठा असला तरी आमचा पक्ष, आमची विचारधारा आहे. त्या विचारधारेने आम्ही पुढे जातो. EVM मशिनमुळे आमचे मत कुणाला जाते हे कळत नाही. त्यामुळे मी खासदार म्हणून अभियान राबवू प्रत्येक मतदारसंघात जास्तीत जास्त उमेदवार उभे करू असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपाकडे काही जागांची मागणी केली होती, पण ती अमान्य करण्यात आल्याने आता जानकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते रासपचे उमेदवार होते आणि भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.