मुंबईतील मराठा मोर्चानंतर मनसे ठरवणार भूमिका
By admin | Published: September 26, 2016 03:07 AM2016-09-26T03:07:39+5:302016-09-26T03:07:39+5:30
कोपर्डी येथील बलात्काराच्या प्रकरणानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली होती.
मुंबई : कोपर्डी येथील बलात्काराच्या प्रकरणानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर अन्य नेते त्यावर बोलू लागले. सध्या राज्यात विविध ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत असून, मुंबईतही मोर्चा होणार आहे. या मोर्चानंतरच मनसे आपली भूमिका जाहीर करेल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी सांगितले.
आगामी महापालिका निवडणुका, मराठा आंदोलन आणि पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पक्षाचे नेते, पदाधिकारी, सरचिटणीस, विभागप्रमुखांची बैठक झाली. स्वत: पक्षप्रमुख राज ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना निश्चित करण्यात आली. सुमारे तासभर ही बैठक चालली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षसंघटनेवर भर देण्यात येणार आहे. राज ठाकरे मुंबईतील प्रत्येक शाखेला भेट देणार असून, गटप्रमुखांशी संवाद साधणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर सांगितले, तर मराठा आंदोलनाच्या संदर्भात मुंबईतील मोर्चानंतर राज ठाकरे याबाबत पक्षाची भूमिका मांडणार आहेत. अॅट्रॉसिटीबाबत सर्वप्रथम राज ठाकरे यांनीच जाहीर भूमिका मांडल्याचे नांदगावकरांनी स्पष्ट केले.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात घेतलेली भूमिका कायम असणार आहे. काही चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी मनसेने ही भूमिका घेतल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी फेटाळून लावला. मनसेच्या विरोधानंतर अनेक जणांनी पाकिस्तानी कलाकारांचे काम बंद केले आहे. काही कलाकारांचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. ज्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला, त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया खोपकर यांनी दिली.
१उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलावंतांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, मनोरंजन क्षेत्रात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग असलेली मालिका बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘झी’ पाठोपाठ, आता ‘कलर्स’ वाहिनी आणि ‘रेडिओ मिर्ची’नेही पाक कलावंतांच्या भूमिका असणाऱ्या मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पाक कलावंतांचे भारतातील ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत.
२‘झी जिंदगी’वाहिनीने पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी सांगितले की, पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये, म्हणून आम्ही अनेक मालिका निर्मात्या कंपन्यांना निवेदने पाठविली आहेत. यापैकी बहुतेकांना आमची भूमिका योग्य वाटत असल्याने काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
३२५ सप्टेंबर(रविवार)
रोजी पाकिस्तानी गायक आतिफ असलम यांची मुलाखत रेडिओ मिर्चीवर होणार होती. मात्र, रेडिओ मिर्चीने ही मुलाखत रद्द केली. दुसरीकडे कलर्स वाहिनीवरील कॉमेडी नाइट्स बचाओ भाग-१ मध्ये काही पाकिस्तानी कलाकार सहभागी झाले होते.
मात्र, आता भाग-२ मध्ये पाकिस्तानी कलावंत दिसणार नाहीत, असे मालिकेचे दिग्दर्शक विपुल शाह यांनी लेखी कळवले आहे, असे चित्रपट सेनेचे सरचिटणीस शशांक नागवेकर यांनी सांगितले.