Devendra Fadnavis: एकापाठोपाठ एक १४ ट्विट करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:04 PM2022-04-14T15:04:32+5:302022-04-14T16:24:05+5:30
राष्ट्रवादी पक्षाचा संपूर्ण इतिहास पाहिला तर अशाच पद्धतीने जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॅार्ड आहे असं फडणवीस म्हणाले.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला आहे. राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) गुढी पाडवा मेळावा आणि उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर थेट जातीयवादाचे आरोप केले. इतकेच नाही तर शरद पवार(Sharad Pawar) हे नास्तिक असून ते मुस्लीम मते जातील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत असा आरोप केला होता. त्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. आता या वादात भाजपानेही उडी घेतली आहे.
भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांना चौफेर हल्लाबोल केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनी फडणवीसांनी पवारांना आंबेडकरी विचारांना बाजूला करत राष्ट्रवादी काँग्रेसचा जातीयवादी राजकारणाचा इतिहास आहे असं म्हटलं आहे. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देत फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० ला कडाडून विरोध होता, एका बाजुला आपण थाटामाटात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करतोय पण दुसऱ्या बाजुला त्यांच्या विचारांना बाजुला करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा विरोध होता. पण पवारांच यावर मत काय हे सर्वांनाच माहिती आहे. पवारांचे याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्य आलं तरी कसलही आश्चर्य नाही. त्यांच्या पक्षाचा संपूर्ण इतिहास पाहिला तर अशाच पद्धतीने जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॅार्ड आहे असं स्मरण करून राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तसेच काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानाचाही फडणवीसांनी समाचार घेतला. काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छबीला धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून? काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना केला.
It is ideal if political parties seek implementation of reforms but they say implement Sachar Committee first ! https://t.co/gZtb4dLVON
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022
दरम्यान, संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला? अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, सच्चर समितीचा अहवाल लागू करा अशी मागणी केली. मुंबई बॉम्बस्फोटानंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे शरद पवारांनी खोटे सांगितले. नवाब मलिक यांना अटक होताच ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय असं पवार म्हणाले. इशरत जहाँ ही निर्दोष होती असंही त्यांनी सांगितले होते. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी प्रयत्न केले. २०१२ मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही असा आरोप करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला.