अखेर एक महिन्यानंतर घरफोडीचा गुन्हा दाखल
By admin | Published: July 11, 2017 03:35 AM2017-07-11T03:35:34+5:302017-07-11T03:35:34+5:30
कोपरखैरणेमध्ये अनिल मोबाइल या दुकानामध्ये ८ जूनला रात्री चोरी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोपरखैरणेमध्ये अनिल मोबाइल या दुकानामध्ये ८ जूनला रात्री चोरी झाली. चोरट्यांनी शटर तोडून आतील रोख रक्कम व २२ मोबाइल चोरून नेले. दुकान मालकाने चोरट्याचे सीसीटीव्हीमधील चित्रण, नाव व पत्ता दिला आहे. पण पोलिसांनी एक महिन्यात गुन्हाही दाखल केला नव्हता. ‘लोकमत’ने याविषयी वृत्त प्रसिद्ध करताच तत्काळ घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
येथील सेक्टर ७ मध्ये शांताराम दानवले यांचे अनिल टेलर्स व अनिल मोबाइल नावाने दोन दुकाने आहेत. ८ जूनला रात्री दुकान बंद करून ते घरी गेले असताना चोरट्यांनी शटर तोडून रोख रक्कम व दुरुस्तीसाठी आलेले २२ मोबाइल चोरून नेले आहेत. या प्रकरणी दानवले यांनी ९ जूनला कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
दुसऱ्या दिवशी दुकानातील सीसी टीव्हीमधील चित्रण तपासले असता कोपरखैरणे परिसरामध्येच राहणाऱ्या सूरज नावाच्या तरुणाने चोरी केल्याचे निदर्शनास आले. हा तरुण कोठे राहतो याचीही माहिती घेवून पोलिसांना देण्यात आली होती.