नवीन अभ्यासक्रमास अखेर ‘मुहूर्त’

By admin | Published: March 7, 2016 01:08 AM2016-03-07T01:08:40+5:302016-03-07T01:08:40+5:30

एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या प्रदीर्घ कालावधीमुळे विद्यार्थ्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यात दोष कुणाचा? यावरून विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये ‘कलगीतुरा’ देखील रंगला

After the new course, 'Muhurat' | नवीन अभ्यासक्रमास अखेर ‘मुहूर्त’

नवीन अभ्यासक्रमास अखेर ‘मुहूर्त’

Next

पुणे : एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या प्रदीर्घ कालावधीमुळे विद्यार्थ्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यात दोष कुणाचा? यावरून विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये ‘कलगीतुरा’ देखील रंगला. अखेर याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन अभ्यासक्रमाच्या निर्मितीकडे पाऊल टाकले. या नवीन अभ्यासक्रमाला अखेर ‘मुहूर्त’ लागला आहे. विद्यापरिषदेची महिन्याभरात मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नवीन विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
विद्यार्थी नक्की करतात तरी काय? अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना इतका वेळ लागतोच कसा? अशा शब्दातं ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी नुकतीच विद्यार्थ्यांची कानउघाडणी करत विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता काही दिवसातच एफटीआयआयची २००८ व २००९ ची बॅच तब्बल आठ ते नऊ वर्षांनंतर संस्थेतून बाहेर पडणार असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, तीन वर्षांच्या मर्यादित वेळेतच विद्यार्थी संस्थेमधून बाहेर पडावेत, अशा नवीन अभ्यासक्रमाची रचना प्रशासनाने केली आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी आणि आवाका लक्षात घेत साडेतीन वर्षांच्या प्रयत्नातून संस्थेने विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात अभ्यासक्रमाच्या निर्मित्तीत विद्यार्थ्यांचा सहभाग हा कदाचित पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
अभ्यासक्रमाच्या काहीशा किचकट प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत अडचणी येत आहेत. याकडे लक्ष वेधून अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलावे या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले.मात्र, प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. एफटीआयआय ही संस्था १९६० मध्ये सुरू झाली.
मात्र, १९७४ पासून या संस्थेचे कामकाज हे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणानुसार चालते. ही एक स्वायत्त संस्था असल्याने वेळोवेळी गरजेनुसार या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. तरीही हा अभ्यासक्रम ठराविक वेळेत विद्यार्थ्यांना पूर्ण करता आलेला नाही. उलट या वर्षांमध्ये दिवसागणिक वाढच होत गेली. या गोष्टीला एफटीआयआय प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधा हे कारण देण्यात आले. (प्रतिनिधी)नवीन विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाली असून, लवकरच त्याचा निकालही लागणार आहे. महिन्याभरात विद्या परिषदेची अभ्यासक्रमाला मान्यता मिळेल, त्यानंतर जुलैपासून हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल.
- उत्तमराव बोडके, कुलसचिव, एफटीआयआय

Web Title: After the new course, 'Muhurat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.