नऊ वर्षांनी एसटीला बाप्पा पावला; ऑगस्टमध्ये १६.८६ कोटींचा महसूल, सर्वाधिक नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 06:04 AM2024-09-13T06:04:00+5:302024-09-13T06:04:36+5:30

गेली काही वर्षे कोरोनाचे संकट, कर्मचारी संप आदी कारणांमुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.

After nine years 16.86 crore revenue in August, highest profit for State transport in Ganeshostav | नऊ वर्षांनी एसटीला बाप्पा पावला; ऑगस्टमध्ये १६.८६ कोटींचा महसूल, सर्वाधिक नफा

नऊ वर्षांनी एसटीला बाप्पा पावला; ऑगस्टमध्ये १६.८६ कोटींचा महसूल, सर्वाधिक नफा

मुंबई - राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला ऑगस्टमध्ये गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक नफा झाला. महामंडळाच्या ३१ विभागांपैकी २० विभागांत १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये इतका नफा झाला आहे. 

एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त पाच हजारांहून अधिक बस कोकणात सोडल्या होत्या. या गाड्यांचे बुकिंग ऑगस्टमध्ये सुरू झाले होते.  गट आरक्षणात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के सवलत दिली होती. त्यामुळे प्रवाशांनी गट आरक्षणाला  प्राधान्य दिल्याचे आढळले.  

गेली काही वर्षे कोरोनाचे संकट, कर्मचारी संप आदी कारणांमुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. महामंडळ डबघाईला येऊन एसटी सेवा बंद पडते की काय? अशी अवस्था झाली होती. यातून बाहेर पडण्यासाठी २०२२ नंतर राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. 

एसटीचे गतवैभव परत आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल. तसेच नव्या बसचा योग्य वापर करून एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. - डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी

एसटीला नफ्यात आणण्यासाठी... 

तोट्यातील विभागांवर पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे 
स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे 
मागणी असलेल्या मार्गावर अतिरिक्त बस चालवणे 
गाड्यांची योग्य देखभाल करणे

योजनांचा परिणाम

एसटीने गेल्या वर्षभरात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास योजना, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन आदी अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळे प्रवाशांनी लालपरीला पुन्हा पसंती दिली असून सध्या दररोज सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीने प्रवास करीत आहेत.

Web Title: After nine years 16.86 crore revenue in August, highest profit for State transport in Ganeshostav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.