नऊ वर्षानंतर पांगरी नवघरेत निघणार बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक
By Admin | Published: November 4, 2016 07:11 PM2016-11-04T19:11:46+5:302016-11-05T00:04:31+5:30
१४ एप्रिल २००७ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही.
ऑनलाइन लोकमत
मालेगाव (वाशिम) , दि. 04 - १४ एप्रिल २००७ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही. आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार ५ नोव्हेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात पांगरी नवघरे गावात बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघणार आहे.
मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे ३८०० लोकसंख्या असून, त्यामध्ये ५०० लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. येथे १४ एप्रिल २००७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत दोन गटांत वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही गटांतील नागरिकांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पांगरी नवघरे येथे १४ एप्रिल २०१६ रोजी मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून ५ एप्रिल रोजी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेतचा प्रश्न समोर करून मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली. या पृष्ठभूमीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात मिरवणुकीला परवानगी मिळावी म्हणून अपिल दाखल करण्यात आले. विद्यमान न्यायालयाने पांगरी नवघरे येथे मिरवणूक काढण्याची परवानगी दिल्याने, ५ नोव्हेंबर रोजी मिरवणूक निघणार आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.