निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 01:07 PM2022-09-10T13:07:12+5:302022-09-10T13:08:34+5:30
युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत अशी माहिती वरुण सरदेसाईंनी दिली.
सोलापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटना बांधणीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेने राज्यभर निर्धार अभियान हाती घेतले आहे. तुळजापूर येथील आई भवानीचा आशीर्वाद घेऊन या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. १० सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात मराठवाड्यातून अभियानाची सुरुवात होत आहे.
याबाबत वरुण सरदेसाई म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि बुलढाण्यातील काही भागाचा मिळून ४८ विधानसभा मतदारसंघाचा हा दौरा आहे. या मतदारसंघात जात तेथील युवासैनिक, युवक युवतींसोबत संवाद साधण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा आहे. सगळ्या युवकांना भेटण्याचा हा दौरा आहे. जास्तीत जास्त तरुणांना युवासेनेशी जोडण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत. येत्या १० दिवसांत सोलापूर विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत युवासेना, संभाजी ब्रिगेड मिळून पूर्ण ताकदीने आम्ही लढू. २ दिवसांपूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुका पार पडल्या. त्याठिकाणी युवासेनेचा सदस्य १६०० मतांनी विजयी झाली. हे पहिल्यांदाच घडलंय. त्यामुळे आमची सुरुवात चांगली झाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती राज्यातील विद्यापीठात करू. प्रत्येक विद्यापीठात युवासेनेचा आवाज पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं वरुण सरदेसाई यांनी सांगितले.
पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांचे लक्ष केंद्रीत
दरम्यान, युवासेनेच्या माध्यमातून काम करायला अनेक तरुण एकवटत आहेत. त्यांना संघटित करण्यासाठी हे अभियान घेतले आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात चांगले तरुण युवासेनेला जोडत आहोत. ज्यांना कुणाला आव्हान द्यायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुठेतरी संघटना वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आम्हीही या अभियानाच्या माध्यमातून युवक, तरुणांसमोर जे काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.