कांद्यानंतर आता बटाट्याचाही तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 05:52 AM2019-12-20T05:52:38+5:302019-12-20T05:52:44+5:30
तीन महिन्यांत दर दुप्पट : एपीएमसीमध्ये बाजारभाव २५ रुपयांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कांद्यानंतर आता बटाट्याचीही टंचाई सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन महिन्यांत भाव दुप्पट झाले आहेत. सद्य:स्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये बटाटा १८ ते २५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ३० ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत.
पावसाळा लांबल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारभावावर होऊ लागला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून देशभर कांदाटंचाई सुरू आहे. यानंतर आता बटाट्याचे दरही वाढू लागले आहेत. सप्टेंबरमध्ये बाजार समितीमध्ये ८ ते १६ रुपये प्रतिकिलो दराने बटाट्याची विक्री होत होती. सद्य:स्थितीमध्ये हे दर १८ ते २५ रुपयांवर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हे दर ३० ते ४० रुपयांवर गेले आहेत.
सद्य:स्थितीमध्ये इंदोरमधून नवीन बटाटा विक्रीसाठी येत आहे. उत्तर प्रदेश व गुजरातमधूनही आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे दर वाढत असल्याची माहिती बटाटा व्यापारी महादेव कळमकर यांनी दिली.
कांदा दरामध्ये घसरण
मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दरही काही प्रमाणात नियंत्रणात आले आहेत. एपीएमसीमध्ये कांदा ७० ते १०० रुपये दराने विकला जात आहे. उन्हाळी कांद्याची आवक जवळपास बंद झाली आहे. या स्थितीमध्ये पुणे, नाशिक, गुजरात, मध्य प्रदेशमधून कांद्याची आवक सुरू आहे.