पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे ?, अजित पवारांची सावध प्रतिक्रिया
By admin | Published: January 25, 2017 11:29 PM2017-01-25T23:29:12+5:302017-01-25T23:29:12+5:30
शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार ? असा सवाल अजित पवारांना विचारला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया घेतली आहे. पवार साहेबांच्या कार्यपद्धतीनुसार काम करणारी व्यक्ती, मग ती पवार आडनावाची असो किंवा सुळे अथवा दुस-या कुठल्याही आडनावाची व्यक्ती वारसदार होऊ शकेल, असं परखड मत अजित पवारांनी मांडलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मात्र अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या नंतर कोण?, याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार म्हणाले, पुण्यात आघाडीसाठी राष्ट्रवादी सकारात्मक आहे पण आघाडी सन्मानपूर्वक व्हायला हवी. नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. नोटाबंदीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र, राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एखादी लाट कायमस्वरूपी राहत नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयला 50 दिवसांत 60 परिपत्रकं का काढावी लागली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.
शरद पवार यांचं काम मोलाचं आहे. त्यामुळे त्यांचा पद्मविभूषणाने सन्मान होणं हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. जी व्यक्त श्रेष्ठ असते ती श्रेष्ठचं असते त्याची तुलना आमच्यासोबत होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत. आम्ही आमच्या परीने काम करत राहिलो. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही सहा वेळा आमदार होऊ शकलो, असंही अजित पवार म्हणाले.