मतदानानंतर शाई पुसण्याचे रसायन सापडले, सहा कार्यकर्ते ताब्यात
By admin | Published: February 21, 2017 04:37 PM2017-02-21T16:37:06+5:302017-02-21T16:37:06+5:30
मतदानाची शाई पुसण्याचे रसायन घेऊन आलेल्या सहा कार्यकर्त्यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाचवेळी जिल्हा परिषद, महापालिकेचे मतदान होत असल्याने जवळच्या ग्रामीण
ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 21 : मतदानाची शाई पुसण्याचे रसायन घेऊन आलेल्या सहा कार्यकर्त्यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाचवेळी जिल्हा परिषद, महापालिकेचे मतदान होत असल्याने जवळच्या ग्रामीण भागात मतदान करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मतदानात सहभागी होण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील शाई पुसण्याचे रसायन, अन्य साहित्य जप्त केले.
महापालिका हद्दीत वाकड परिसर आहे. परंतु या परिसराला लागूनच हिंजवडी,माण, मारूंजी हा ग्रामीण परिसर आहे. सकाळी माण, मारुंजी, हिंजवडी भागातील मतदान केंद्रावर मतदान करून दुसऱ्यांदा महापालिकेच्या प्रभागात मतदान करण्यासाठी तरुणांची टोळकी वाकडमध्ये दाखल झाली. जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत बोटाला लावलेली शाई त्यांनी विशिष्ट रसायन लावून पुसून काढली. काहींच्या बोटांची शाई काढण्याचा प्रयत्न होत असताना, या प्रकाराबद्दलची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शाई पुसण्याचे रसायन आणि अन्य साहित्य घेऊन आलेल्या तरूणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल. असे पोलिसांनी सांगितले.