बलात्कारानंतर खून करणाऱ्याला फाशीच
By admin | Published: January 22, 2016 03:34 AM2016-01-22T03:34:44+5:302016-01-22T03:34:44+5:30
जालना शहरातील दोन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला जालन्याच्या सत्र न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली ठोठावलेली फाशीची शिक्षा
औरंगाबाद : जालना शहरातील दोन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला जालन्याच्या सत्र न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली.
रवी अशोक घुमारे (२९) असे आरोपीचे नाव असून त्याने जालना येथे ६ मार्च २०१२ रोजी दोन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून केला. पोलिसांनी त्याच्यावर बालिकेचे अपहरण करणे, शारीरिक अत्याचार करणे, अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करणे आणि खून
करणे आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविला.
जालन्याचे सत्र न्यायाधीश आशुतोष एन. करमरकर यांनी १८ सप्टेंबर २०१५ रोजी रवीला शारीरिक अत्याचाराच्या आरोपाखाली जन्मठेप आणि खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली.
फाशीची शिक्षा कायम होण्यासाठी (कन्फर्मेशन) प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे पाठविले होते. तसेच आरोपीतर्फे शिक्षेस आव्हान देणारे अपीलही खंडपीठात दाखल करण्यात आले होते. औरंगाबाद खंडपीठात ‘कन्फर्मेशन केस’ आणि आरोपीचे अपील यावर एकत्रित सुनावणी झाली. सुनावणीअंती रवीने
केलेले कृत्य हे ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (रेअरेस्ट आॅफ रेअर) असल्याचे
सांगत न्या. ए.व्ही. निरगुडे आणि न्या. आय. के. जैन यांनी यांच्या खंडपीठाने रवीची फाशीची शिक्षा कायम
केली. (प्रतिनिधी)