रवी राणांच्या धमकीनंतर बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना आवाहन; सगळ्यांच्या अंगात ताकद, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:51 AM2022-11-03T09:51:58+5:302022-11-03T09:52:31+5:30
रवी राणासोबतच्या विषयाला आणखी वाढवू इच्छित नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माझ्या मतदारसंघात जो निधी दिला त्यासाठी आभार मानण्यासाठी जाणार आहोत असं कडू यांनी सांगितले.
मुंबई - रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. मला दम देत असाल तर घरात घुसून मारण्याची धमकी रवी राणांनी दिली. त्यानंतर कडू यांनी ५ तारखेला मी घरात आहे. ज्याला घरी यायचं आहे त्यांनी यावं, आम्ही तयार आहोत अशा शब्दात रवी राणांवर पलटवार केला आहे. त्यामुळे राणा-कडू यांच्या वादाचा दुसरा अंक सुरू झाला असून याबाबत आज बच्चू कडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
बच्चू कडू म्हणाले की, रवी राणासोबतच्या विषयाला आणखी वाढवू इच्छित नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माझ्या मतदारसंघात जो निधी दिला त्यासाठी आभार मानण्यासाठी जाणार आहोत. राणा विषयाकडे दुर्लक्ष करा असं अनेकांनी फोन करून सांगितले. व्यक्तिगत वादासाठी मी कधीही समोर आलो नव्हतो. विकासाचा दृष्टीकोन घेऊन आम्ही पुढे जात आहोत असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत मी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, रवी राणा वादावर ऊर्जा खर्ची करू नका. प्रसंगी ४ पाऊलं मागे घेऊ. चांगल्या कामासाठी मला ऊर्जा कामाला लावायची आहे. सगळ्यांच्या अंगात ताकद असते. मजबूत असतो. रवी राणासोबतच्या या विषयाला इथेच थांबवायचं आहे. त्यांच्या मागे कोण यावर मी बोलण्यास अर्थ नाही. या विषयावर मी बोलणार नाही असं सांगत बच्चू कडू यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते रवी राणा?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे बच्चू कडू यांच्यासोबतचा वाद मिटला आहे. पण लक्षात घ्या, कुणी मला दम देत असेल तर रवी राणाने उद्धव ठाकरेंचाही दम खाल्ला नाही. बच्चू कडू काहीच नाही. जर कडू दम देत बोलत असेल तर कुठल्याही स्तरावर मी उत्तर देईन. तो ज्या स्तरावर बोलेल त्यावर उत्तर देईन. प्रेमाच्या भाषेपुढे रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेल. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायचीही हिंमत आहे असा इशारा आमदार रवी राणांनी दिला होता.
त्याचसोबत मंत्री बनणं हा माझा अधिकार नाही. माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान ठेवत मी २ पाऊलं मागे आलो. दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यात कुणाचेही मन दुखायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला. पण वारंवार मला कुणी दम देत असेल मी रवी राणाला माफ करणार नाही म्हटलं. तुला कुणी सांगितले माफ करायला? तुझ्यात जेवढी हिंमत असेल तू कसा निवडून येतो पाहा. वेळ सांगेल बच्चू कडू पुन्हा आमदार निवडून येतो की नाही असंही रवी राणांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेसुद्धा अखडून राहायचे. परंतु त्यांना मातीत धूळ खावी लागली. त्यामुळे जे असे अखडतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान करत नाही. एखादा आमदार मनमोकळे करून पुढे येऊन दिलगिरी व्यक्त करतोय. त्याच्यावर दमदाटीची भाषा वापरली जात असेल तर बच्चू कडू हा विषय माझ्यासाठी खूप छोटा आहे. त्याला कसं उत्तर द्यायचं मला माहिती आहे. यापुढे तो ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा रवी राणांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"