हसन मुश्रिफांचं घर समजून भलत्याच व्यक्तीच्या घरावर ईडीची धाड, फजिती लक्षात आल्यावर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:36 AM2023-01-12T00:36:57+5:302023-01-12T00:37:44+5:30
Hasan Mushrif : हसन मुश्रिफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी करताना ईडीच्या पथकांकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. ईडीच्या पथकांनी हसन मुश्रिफांचं घर समजून एका भलत्याच व्यक्तीच्या घरावर छापा मारल्याचे समोर आले आहे.
माजी मंत्री आणि कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रिफ यांच्या निवासस्थानासह विविध मालमत्तांवर ईडीने धाड घातल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोपांचे सत्र रंगले होते. दरम्यान, हसन मुश्रिफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी करताना ईडीच्या पथकांकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. ईडीच्या पथकांनी हसन मुश्रिफांचं घर समजून एका भलत्याच व्यक्तीच्या घरावर छापा मारल्याचे समोर आले आहे.
ईडीच्या पथकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या कागल येथील निवासस्थानी बुधवारी पहाटे धाड टाकली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. मात्र यादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी एक चूक केली. ईडीचे अधिकारी हसन मुश्रिफ यांघे घर समजून एका उद्योगपतीच्या घरावर धाड टाकली. मात्र आणप चुकीच्या व्यक्तीच्या घरावर धाड टाकल्याचे लक्षात आल्यावर ई़डीच्या अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. कागल बरोबर कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरात बंगल्यात ईडीचे काही अधिकारी आले होते. मात्र शेजारील असलेल्या बंगल्यात त्यांनी प्रवेश केला, मात्र लवकरच ते माघारी गेले. दरम्यान, या ईडीच्या या चुकलेल्या धाडीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.
दरम्यान, ईडी आणि आयकर विभागाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान नक्की काय सापडलं याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पण महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी मात्र ही राजकीय सूडबुद्धी असल्याचे म्हटले आहे. तसेच, याचा संबंध धार्मिक गोष्टींची आहे का, अशा आशयाची शंकाही व्यक्त केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीने छापा टाकला. त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार आहे, याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज बंद करण्याचा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते.